Tuesday, March 17, 2009

सुमन मोटेल्स'च्या सुरेंद्र खंदारला जामीन


गुंतवणूकदारांची फसवणूक ः पत्नी, मुलाचीही सुटका


हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला सुमन मोटेल्स कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र खंदार, त्याची पत्नी भारती व मुलगा तेजस या तिघांची भोईवाडा येथील सुटीकालीन न्यायाधीशांनी जामिनावर सुटका केली. अजामीनपात्र गुन्ह्यातून कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत स्वतःची सुटका करून घेणाऱ्या खंदार आणि त्याच्या संचालक मंडळाविरुद्ध विविध राज्यांतून येणाऱ्या अटक वॉरंटस्‌ व समन्समुळे स्थानिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
माटुंगा-पूर्वेला तेज गौरव हाऊस येथे राहणाऱ्या सुरेंद्र, त्याची पत्नी भारती खंदार यांच्याविरुद्ध गुजरात राज्यातील मेहसाणा, अलाहाबाद व अंधेरी न्यायालयातून समन्स व अटक वॉरंट बजावण्यात आले होते. हे वॉरंट देण्यासाठी गेलेल्या माटुंगा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरेंद्र खंदार व त्याची पत्नी भारती यांना पोलिसांनी पकडले. या वेळी सुरेंद्र खंदार व त्याचा मुलगा तेजस यांनी पोलिसांनाच मारहाण केली. या तिघांना अटक केल्यानंतर भोईवाडा न्यायालयाने पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी 10 हजार रुपये; तर वॉरंटप्रकरणी प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. या वेळी न्यायालयाने गुजरात, अलाहाबाद व अंधेरी येथील तारखांना हजर राहण्यासंबंधीचा बॉण्ड लिहून घेतला.
"सुमन मोटेल्स'च्या संचालक मंडळाविरुद्ध देशभरातील 62 हजार 552 गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गुंतवणूकदारांना देशोधडीला लावणाऱ्या "सुमन मोटेल्स'च्या संचालक मंडळाविरुद्ध देशभरातील न्यायालयातून आजवर 500 च्यावर अटक वॉरंट व समन्स बजावण्यात आली आहेत. माटुंगा येथे गेली अनेक वर्षे वास्तव्य असलेला सुरेंद्र खंदार विविध राज्यांतून बजावण्यात आलेली वॉरंट देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सापडतच नाही. अनेकदा खंदार यांचा मुलगाच पोलिसांच्या हाती सापडतो. त्याशिवाय "सुमन मोटेल्स'च्या विविध ठिकाणी असलेली कार्यालये सुरेंद्र खंदारने भाडेतत्त्वावर दिले असल्याने देशभरातून आलेल्या न्यायालयाच्या नोटिसादेखील तशाच परत जातात. कायद्याप्रमाणे महिलांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने सुरेंद्र खंदार व त्याची पत्नी अनेकदा रात्रीचेच घरी येतात आणि सूर्योदयापूर्वी निघून जातात. अटक वॉरंट अथवा समन्स नसल्यावर काही वेळा आरोपी समोर असले तरी त्यांच्यावर कारवाई करणे अवघड होते. कायद्यातील पळवाटांमुळे या आरोपींचे फावत असल्याचे माटुंग्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
"सुमन मोटेल्स'च्या हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांचा लढा अद्याप सुरू आहे. ग्राहक न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे गुंतवणूकदार चेतन कोठारी यांना त्यांनी गुंतविलेल्या तीन लाख रुपयांच्या मोबदल्यात पाच लाख रुपये मिळाले आहेत; मात्र फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या पदरी अद्याप फुटकी कवडीदेखील पडली नसल्याचे चित्र आहे. या गुंतवणूकदारांनाही त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार चेतन कोठारी यांनी व्यक्त केली.


(sakal,12 march)

No comments: