Tuesday, March 17, 2009

कॉंग्रेसनेते केशवराव भोसलेंचा स्वतःच्याच मुलांवर गोळीबार

मालमत्तेचा वाद ः एकाचा मृत्यू; दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

पहिल्या पत्नीच्या दोघा मुलांसोबत मालमत्तेच्या विभागणीवरून झालेल्या वादात कॉंग्रेसचे नेते केशवराव भोसले आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी परस्परांवर रिव्हॉल्व्हर आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक मुलगा ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी मलबार हिल येथे घडली. या वेळी तलवार हल्ल्यात जखमी झालेले भोसले आणि गोळ्या लागलेला एक मुलगा या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या पत्नीच्या श्राद्धाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे भोसले यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाळकेश्‍वर येथील बाणगंगा परिसरात असलेल्या "पार्श्‍व' अपार्टमेंटमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केशवराव यांच्या पहिल्या पत्नीच्या आज असलेल्या वर्षश्राद्धासाठी त्यांची दोन मुले राजेश (28) आणि गणेश (30) हे उपस्थित होते. श्राद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर केशवराव त्यांच्या दोघा मुलांसोबत बसले होते. या वेळी मालमत्तेच्या विभागणीवरून बाप-लेकांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान काही क्षणातच हाणामारीत होऊन मुलांनी भोसले यांना मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी एकाने घरात असलेल्या तलवारीने भोसले यांच्यावर वार केला. त्यानंतर रागाच्या भरात भोसले यांनी स्वतःकडील रिव्हॉल्व्हर काढून गणेश आणि राजेशच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. दोन गोळ्या गणेशच्या छातीत आणि डोक्‍यात शिरल्या, तर राजेशच्या पोटात आणि गालाला गोळ्या लागल्या. "पार्श्‍व' इमारतीत पहिल्या व सहाव्या मजल्यावर त्यांचे एकूण तीन फ्लॅट आहेत. येथील एका बंद खोलीत घडलेली ही घटना इमारतीतील रहिवाशांना कळण्यास फारसा वेळ लागला नाही. जखमी अवस्थेतील तिघांनाही नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. गोळ्या लागलेल्या गणेशचा सेंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर जखमी राजेशवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांच्या तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या केशव भोसलेंवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसले यांच्या उजव्या हातावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. भोसले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. भोसले यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा परवाना खेड येथून मिळविलेला असून, पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खेड येथून 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविलेले भोसले मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. 1984 मध्ये राजभवन परिसरात झालेल्या एका तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या भोसले यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेलेले भोसले गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला सारले गेले होते. काही वर्षांपूर्वी भोसले यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही मुलांची लग्ने महालक्ष्मी रेसकोर्सवर थाटामाटात केली होती. आज त्यांनी याच मुलांवर मालमत्तेच्या वादातून गोळीबार केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी दिली.

(sakal,6 march)

No comments: