Thursday, January 1, 2009

यापेक्षा दुर्दैव ते कसले?

उल्हास फाटक ः जलतरणपटू विनोद घाडगे यांच्या मृत्यूमुळे वरळीवर शोककळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः "आजवर त्याने केलेल्या जलतरणातील सगळ्या विक्रमांना मी त्याच्या सोबत होतो. मी सोबत असल्यावर विक्रम यशस्वी होतो, असं त्याला नेहमी वाटायचं. काल रात्रीही मी नेहमीप्रमाणे त्याच्या सोबतच होतो. बोटीपासून अवघ्या दीड मीटर लांबून तो सपासप पाणी कापत गेटवेच्या दिशेने पुढे पुढे जात होता अन्‌ अचानक मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात तो अडकला. जाळे लावलेल्या कोळ्याने लांबून आरोळी ठोकली तेव्हा लक्षात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बोट वळवून मागे येईपर्यंत बोटीत असलेल्या काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्याही मारल्या; मात्र "त्या' पाच-सात मिनिटांत सारे काही संपले होते. माझ्या नजरेसमोर त्याला मृत्यू आला; मात्र त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर बोटीत असलेले आम्ही काहीच करू शकलो नाही. आजवर शेकडोंना पोहायला शिकविणाऱ्या विक्रमवीर जलतरणपटूचा अंतही पाण्यातच होणे यापेक्षा दुर्दैव ते कसले,' अशी भावना विक्रमवीर जलतरणपटू विनोद घाडगे यांचे जिवलग मित्र उल्हास फाटक यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जलतरणपटू विनोद घाडगे यांनी शिष्य धनंजय कांबरेकर यांच्यासह धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया असे 36 किलोमीटरचे अंतर पोहण्याचा संकल्प सोडला होता. या संकल्पपूर्तीसाठी ते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन लहान बोटी, एका मोठ्या लॉंचवर मित्र, आप्तेष्ट, सहकारी असा तब्बल साठ जणांचा लवाजमा घेऊन काल धरमतर येथे गेले होते. यानंतर करंजा येथे प्रीतम या कोळी मित्राकडे त्यांनी जेवण केले. मध्यरात्री दोन वाजता घाडगे यांनी धरमतरच्या किनाऱ्यावरून धनंजय कोंबरेकर याला पाण्यात उडी मारायला लावली. वीस मिनिटांनी पाण्यात उडी मारून धनंजयला गाठता येईल असा त्यांचा विचार होता. त्यानुसार दोन बोटी आणि लॉंच धनंजयसोबतच पुढे पाठविण्यात आल्या.
विक्रीकर खात्यात अधिकारी असलेल्या विनोद घाडगे यांच्या बोटीत त्यांच्या खात्याचे अतिरिक्त आयुक्त आर.आर.पाटील, मित्र उल्हास फाटक आणि अन्य मित्रही होते. 2 वाजून 21 मिनिटांनी त्यांनी पोहण्यासाठी समुद्रात उडी मारली. दोन तास पोहून त्यांनी अंतरही पार केले. या काळात श्री. पाटील यांनी त्यांना दोन वेळा खायलाही दिले. तर फाटक त्यांना प्रोत्साहन देत होते. गडद काळोखात बोटीच्या मागे ते अवघ्या दीड ते दोन मीटर अंतरावरून पोहत होते. याच वेळी बोट अचानक मासेमारीसाठी जाळे टाकलेल्या ठिकाणावर शिरली. सर्वत्र गडद अंधार असल्याने समुद्रात मासेमारीसाठी टाकलेले जाळे कोणालाच दिसले नाही. साधारण शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका कोळ्याने जोरात आरोळी ठोकून तेथे जाळे असल्याचे सांगितले. तोपर्यंत बोट हे जाळे पार करून पुढे गेली. मात्र बोटीवर असलेल्या फाटक यांच्या मनात पुढच्याच क्षणात विनोद घाडगे यांचा विचार आला. घाडगे यांना पाहण्यासाठी म्हणून बोटीतील सगळे मागे वळले तर ते समुद्रात कुठेच दिसत नव्हते. बोट मागे वळवून त्यांच्याकडे जाईपर्यंत जाळ्यात अडकून तो अंतिम श्‍वास घेत होता. हे सांगताना फाटक यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

---------

वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
जलतरणपटू घाडगे यांच्या मृत्यूची बातमी समजताच ते राहत असलेल्या वरळीच्या फ्लोरा परिसरातील गोदावरी इमारतीवर शोककळा पसरली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरणच्या शासकीय रुग्णालयातून त्यांचे शव वरळी येथील निवासस्थानी आणण्यात आले. पत्नी उमा (39), मुलगा सिद्धांत (8 वर्षे ) व मुलगी निर्मिती (11 वर्षे ) यांच्यासह तीन बंधू आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूच्या वृत्तानंतर त्यांचे शिष्य, सहकारी, मित्र व चाहत्या वर्गाने वरळी परिसरात एकच गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

छंदासाठी नोकरी बदलली
मूळचे सातारा येथील राहणारे घाडगे यांनी दादरच्या रानडे रोडवर फुले विकून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी मिळविली. याच वेळी त्यांनी आपला पोहण्याचा छंदही जोपासला. नंतर याच छंदाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी काही काळ विशेष शाखेत नोकरीही केली. पोहण्याच्या छंद अधिकाधिक चांगल्या प्रकारे जोपासता यावा यासाठी त्यांनी विक्रीकर विभागात अधिकारी पदावर नोकरी स्वीकारली. त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. बाळासाहेब, विनोद आणि गणेश या तिन्ही भावंडांनी चार वर्षांपूर्वी जिब्राल्टरची खाडी विक्रमी वेळात पोहण्याचा विक्रम केला होता.

No comments: