Saturday, June 13, 2009

दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ विश्‍लेषण

कौल लोकसभेचा






नागरिकांच्या समस्या सोडविणाऱ्या पक्षाकडे विजयश्री


एकीकडे आशियातली सर्वांत बकाल वस्ती समजली जाणारी धारावी आणि दुसरीकडे सुसंस्कृत आणि उच्चविद्याभूषितांचे वास्तव्य असलेला दादर, माहीमसारखा परिसर अशा विकासाच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या उपनगरांचा अंतर्भाव असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाकडे पाहिले जाते. कोणे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघावर गेल्या दोन टर्म कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे वर्चस्व आहे.

लोकसभेचे माजी सभापती शिवसेने मनोहर जोशी यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला कॉंग्रेस आघाडीच्या एकनाथ गायकवाड यांनी 2004 च्या निवडणुकीत पराभवाची धूळ चारल्यानंतर कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेला हा मतदारसंघ यंदा एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत सगळी ताकद पणाला लावल्यानंतरही स्वतःकडे राखणे शिवसेनेला जमले नाही. गेली अनेक वर्षे विकासापासून दूर राहिलेल्या धारावीसारख्या झोपडीतील मतदारांनीही शिवसेनेला साथ न देता कॉंग्रेससोबत राहणे पसंत केल्याचे चित्र या लोकसभा निवडणुकीत दिसले. या लोकसभा मतदारसंघात माहीम, वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. 15 लाख 15 हजार 644 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात अवघ्या 5 लाख 99 हजार 628 मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील एकूण परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस आघाडीला हा मतदारसंघ भविष्यात अधिक "सेफ' करण्यासाठी येत्या काळात जनतेच्या प्रश्‍नांचा सातत्याने निपटारा करावा लागेल. त्यानंतरच हा मतदारसंघ कॉंग्रेसआघाडीकरिता "सेफहोम' समजला जाईल.

अणुशक्तीनगर
विधानसभेच्या 2004 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेल्या या मतदारसंघात युसूफ महम्मद हुसेन अब्राहमी आमदार आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे या उमेदवाराचा पराभव केला होता. भाभा अणुसंशोधन केंद्रासह या परिसराला लागून असलेला; झोपडपट्टी तसेच मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असलेल्या या मतदारसंघात 2 लाख 24 हजार 19 एवढे मतदार आहेत. प्रत्यक्षात या मतदारसंघात फक्त 87 हजार 685 एवढेच मतदान झाले. या मतदारसंघातील एकूण मतदानाची आकडेवारी 39.14 टक्के एवढी आहे. या मतदारसंघात राहणाऱ्या डॉ. शैलेंद्रकुमार घोष यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढविली; मात्र त्यांना येथील मतदारांनीही स्पष्टपणे नाकारले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डॉ. घोष यांनी कोणत्याही पूर्तयारीशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना स्वतःच्या होमटाऊनमध्येही चांगला स्कोअर करता आलेला नाही. या मतदारसंघातून कॉंग्रेस आघाडीच्या एकनाथ गायकवाड यांना पहिल्या फेरीपासूनच पहिल्या पसंतीची मते मिळत होती. यापाठोपाठ शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांचा, तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्‍वेता परुळकर या राहिल्या.

चेंबूर
बौद्ध धर्मीयांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असलेला हा मतदारसंघ. कॉंग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले आमदार चंद्रकांत हंडोरे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रमोद शिरवळकर यांचा पराभव केला होता. राज्याच्या सामाजिक न्यायमंत्रिपदावर असलेल्या हंडोरे यांच्या या मतदारसंघावर असलेल्या वर्चस्वामुळे या ठिकाणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलाच फायदा झाला. या मतदारसंघात एकूण 2 लाख 45 हजार 934 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 5 हजार 961 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी घराबाहेर काढले. नेमकी हीच बाब शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांना जमली नाही, असे म्हणता येईल. या मतदारसंघातही अगदी पहिल्या फेरीतच कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना 3692 मते पडली होती. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यांत गायकवाड यांना चांगली मते मिळाली. या मतदारसंघात राहणारे भारत उदय मिशन पक्षाच्या डॉ. अकल्पिता परांजपे, रिपब्लिकन पक्षाच्या कमल वाघधरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) या पक्षाचे मिलिंद गरुड या स्थानिक उमेदवारांनाही गायकवाड यांना विजयापासून रोखता आले नाही. या उमेदवारांना प्रत्येक फेरीत मिळालेल्या मतदानाचा एकदाही तिहेरी आकडा गाठता आला नाही.

धारावी
धारावी डेव्हलपमेंट प्लॅनच्या माध्यमातून झोपडीवासीयांना किमान साडेतीनशे चौरस फुटांची घरे तसेच दुकाने मिळवून देण्याचे जाहीरनाम्यात सांगून मतदारांना शिवसेना-भाजप युतीने भुलविले; मात्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धारावी विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी असफल ठरविला. याचा अर्थ कॉंग्रेस आघाडीनेदेखील या मतदारसंघावर पुरेसे लक्ष दिले आहे असे नाही. या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले एकनाथ गायकवाड यांना येथील मतदारांना दुसऱ्यांदा लोकसभेवर पाठविले आहे; मात्र त्यांनाही या मतदारसंघाच्या विकासाच्या कामाला न्याय देणे म्हणावे तेवढे जमले नाही. एकनाथ गायकवाड खासदार झाल्यानंतर धारावी विधानसभेची जागा त्यांची कन्या वर्षा यांच्याकडे गेली. येथील मतदारांनी विधानसभेसाठी वर्षा गायकवाड यांना 2004 मध्ये मताधिक्‍य दिले. त्यांनी शिवसेनेच्या स्नेहल जाधव यांचा पराभव केला होता; मात्र गेल्या काही वर्षांत या मतदारसंघातील स्थिती बदलली आहे. धारावीच्या विकासासाठी केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचे पॅकेज आणले असले तरी येथील मतदारांनी गायकवाड यांच्यासह सर्वच पक्षांबद्दलची नाराजी मतपेटीतून उघडपणे दाखवून दिली. या ठिकाणी 2 लाख 65 हजार 112 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 88 हजार 469 एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी गायकवाड यांच्यासह शिवसेना युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्याबाबतही तेवढीच उदासीनता दर्शविल्याचे चित्र या मतदारसंघात आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसंख्येच्या मानाने सर्वांत मोठ्या समजल्या धारावी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत फक्त 33.37 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार पद भूषविलेले एकनाथ गायकवाड यंदा या मतदारसंघातून दलित, मागासवर्गीय तसेच कष्टकरी जनतेची
म्हणावी तेवढी मते मिळवू शकले नाहीत. त्यामानाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परुळकर यांना ही मते मिळविण्यात चांगले यश मिळविले, असेही म्हणता येईल.

सायन-कोळीवाडा
मतदार पुनर्रचनेत सायन-कोळीवाडा या नव्या मतदारसंघाची निर्मिती झाली. यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना हा स्वतंत्र मतदारसंघ सामोरा गेला. दक्षिण-मध्य मुंबईतील सर्वांत मोठा मतदारसंघ अशी या विधानसभा मतदारसंघाची ओळख सांगता येईल. या मतदारसंघात 2 लाख 87 हजार 876 मतदार आहेत. प्रामुख्याने कॉंग्रेसचेच प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात पिढ्यान्‌पिढ्या राहणाऱ्या कोळीबांधवांची भूमिका येथील पहिलावहिला आमदार ठरविणार आहे. यापूर्वी या विभागातील बराचसा भाग माटुंगा विधानसभा मतदारसंघात होता. या विभागातून कॉंग्रेसचे जगन्नाथ शेट्टी हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबूभाई भवानजी यांचा पराभव केला होता. शेट्टी यांना शीव कोळीवाड्यातील मतदारांच्या मिळालेल्या मतांमुळेच शेट्टीकरिता विधानसभेची दारे उघडी झाल्याचे बोलले जाते. मतदार पुनर्रचनेत शेट्टी यांचा माटुंगा मतदारसंघ रद्द झाला आहे. यापुढील काळातही जगन्नाथ शेट्टीच या परिसरातून आपले नशीब अजमावतील असा अंदाज आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर यंदा पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनाच हात दिला. या निवडणुकीत 98 हजार 738 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येत्या काळात या मतदारसंघावर आपला दबदबा वाढविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीला या मतदारसंघाची नव्याने बांधणी करावी लागेल. तसेच या ठिकाणी असलेल्या स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्यास या मतदारसंघात करिष्मा होण्याची शक्‍यताही जाणकार वर्तवितात.

वडाळा
मतदारसंघ पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला हा मतदारसंघ आहे. 2 लाख 40 हजार 201 मतदारसंख्या असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 41.76 टक्के मतदान झाले. या ठिकाणी राहणाऱ्या 1 लाख 318 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव, माटुंगा आणि शिवडी असे तीन विधानसभा मतदारसंघ फोडून तयार केलेल्या या मतदारसंघात कोणे एकेकाळी शिवसेनेचे अधिराज्य होते; मात्र नतंरच्या काळात या संबंध परिसरावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. नायगाव येथून 2004 मध्ये शिसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणे यंच्यासोबत कॉंग्रेसमध्ये गेले. त्यानंतर या परिसरावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व कमी कमी होत गेले. प्रभादेवी येथील काही भागही या मतदारसंघात जोडला गेला आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघाचाही अंतर्भाव या मतदारसंघात असल्याने शिवडीचे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार सचिन अहिर हेदेखील या मतदारसंघात येत्या काळात मोर्चेबांधणी करीत असल्यास वावगे वाटू नये. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र या संपूर्ण मतदारसंघावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परुळकर यांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला. या मतदारसंघातील बहुसंख्य मराठी मतदारांनी परुळकर यांच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे येत्या काळात हा मतदारसंघ मराठी मतदारांबाबत महत्त्वाची भूमिका बजाविण्याची चिन्हे आहेत.

माहीम
शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांचे हे "होमपिच'. या मतदारसंघावर गंभीर यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात निर्माण केलेली पकड तशी उल्लेखनीय म्हणावी लागेल. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत गंभीर यांनी कॉंग्रेसच्या अजित सावंत यांचा अवघ्या 2004 मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर गंभीर यांनी या मतदारसंघात केलेली कामे लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य वाढविण्यास काही अंशी महत्त्वाची ठरली. प्रभादेवी, वरळी आणि दादरचा काही भाग असा बहुतांश मराठी मतदार असलेला हा मतदारसंघ शिवसेनेची पाळेमुळे नव्याने रोवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल; मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभे राहिलेले कडवे आव्हान या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांपुढे राहणार आहे. 2 लाख 62 हजार 402 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 1 लाख 18 हजार 337 एवढे मतदान झाले. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे 46.90 टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे. या ठिकाणी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढल्याचे चित्र असले तरी येथील मतदारांनी आपल्या मतांचा कौल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार परुळकर यांच्या बाजूने दिल्याचे आकडे सांगतात. मितभाषी असलेल्या शिवसेना आमदार गंभीर यांच्यासमोर या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभ्या केलेल्या आव्हानामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय या मतदारसंघावर चांगली पकड असलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनीही गंभीर यांच्यासाठी काम करण्यात तेवढा रस न दाखविल्यामुळेच गंभीरांना पराभवाचा सामना करावा लागला.


(sakaal, 9th june)

No comments: