Sunday, June 7, 2009

दोन कोटी अकरा लाखांचे ब्राऊन शुगर जप्त

त्रिकुटाला अटक ः अफूपासून ब्राऊन शुगर बनविण्याचा धंदा

अवघ्या 35 हजार रुपयांत खरेदी केलेल्या अफूपासून तयार केलेले ब्राऊन शुगर मुंबईत विकण्यासाठी आलेल्या तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या त्रिकुटाकडून पोलिसांनी दोन किलो 164 ग्रॅम ब्राऊन शुगर हस्तगत केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी 11 लाख रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. मुंबईत हे अमली पदार्थ ते कोणाला विकणार होते याचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई सेंट्रल पोस्ट ऑफिसजवळ बेलासिस रोडवर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री केली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश महाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने या ठिकाणी सापळा रचून काल दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास महम्मद रफिक महम्मद हनिफ शेख (43), देवीलाल जाट (32) आणि दुर्गाशंकर गुज्जर (24) या तिघा जणांना अटक केली. त्यांच्या झडतीत त्यांच्याकडे दोन किलो 164 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर सापडले. या तिघा आरोपींपैकी राजस्थानच्या चितोड येथे राहणाऱ्या देवीलाल जाट याला अफूपासून ब्राऊन शुगर बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे. गेली अनेक वर्षे अमली पदार्थांच्या व्यवसायात असलेल्या जाट याने चितोड येथील दुर्गाशंकर गुज्जर आणि मध्य प्रदेशच्या मंडसौर येथील महम्मद शेख याच्यासोबत अमली पदार्थांच्या विक्रीचा व्यापार सुरू केला होता. अवघ्या 35 हजार रुपयांना खरेदी केलेल्या अफूपासून जाट याने चितोड येथे चांगल्या प्रतीचे ब्राऊन शुगर बनविले होते. अफूपासून ब्राऊन शुगर बनविण्याचे तंत्र अवगत असल्याने अवघ्या काही हजारांत त्यांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ बनविले. शेख याच्या मदतीनेच या अमली पदार्थांची ते मुंबईत विक्री करणार होते. मंडसौर येथे राहणाऱ्या महम्मद शेखला 2004 मध्ये नवी दिल्लीत अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यासह केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. याप्रकरणी साडेचार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर वर्षभरापूर्वी त्याची तुरुंगातून सुटला झाली. देवीलाल जाट यालाही 2005 मध्ये नवी दिल्लीत केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने 10 किलोच्या ब्राऊन शुगरसह अटक केली होती. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बाहेर आलेल्या जाट याने शेख आणि गुज्जर यांच्यासोबत नव्याने अमली पदार
्थांचा व्यापार सुरू केला होता. या सर्व आरोपींना 4 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवले जाणार असल्याचेही मारिया यांनी या वेळी सांगितले.


(sakaal,28th may)

No comments: