Sunday, June 7, 2009

सायबर कॅफेमध्ये घेणार ग्राहकांच्या हाताचे ठसे!

छायाचित्रेही घेणार; पोलिसांची अभिनव योजना


सायबर गुन्हेगारीसाठी सायबर कॅफेंचा वापर होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आता एक अभिनव योजना हाती घेतली आहे. शहरातील सर्व सायबर कॅफेंमध्ये ग्राहकांच्या हाताचे ठसे घेणारे उपकरण बसविण्याची तसेच वेबकॅमवरून त्यांची छायाचित्रे काढण्याची सक्ती करण्याचा विचार मुंबई पोलिस करीत असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सायबर कॅफेंमध्ये येणाऱ्या ग्राहकांची ओळखपत्रे तपासल्याशिवाय त्यांना इंटरनेटचा वापर करू देऊ नये, असा नियम पोलिसांनी केला. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाची नोंद एका वहीत करण्यात येऊ लागली; मात्र अनेकदा हा नियम तंतोतंत पाळला जात नसल्याचे स्पष्ट होऊ लागले. गुन्हेगारांनी गुन्ह्यासाठी सायबर कॅफेचा वापर केल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील सर्व सायबर कॅफेंमध्ये इंटरनेटचा वापर करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या हाताचे ठसे घेणारे उपकरण बसविण्याचे तसेच वेबकॅमद्वारे त्यांची छायाचित्रे घेणारे उपकरण बसविले जाणार आहे. या उपकरणांमुळे इंटरनेटचा वापर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची माहिती पोलिसांना त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. यासंबंधी सायबर कॅफेमालकांशी पोलिसांची चर्चा सुरू असून लवकरच ही योजना अमलात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली. सायबर कॅफेचालकांसाठी मुंबई पोलिसांकडून परवाना देण्यात येतो. या परवान्यातच सायबर कॅफेंमधील सुरक्षिततेसंबंधीच्या देण्यात येणाऱ्या सूचनांसोबतच या नवीन अटींचीदेखील माहिती देण्यात येणार असल्याचेही भारती या वेळी म्हणाले

(sakaal,3rd june)

No comments: