मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याकरिता मुंबईत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) तळाचे काम पूर्ण झाले असून या तळाचे उद्घाटन येत्या 30 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वेळी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविण्याकरिता दिल्ली येथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी या पथकाच्या कमांडोंसह मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भविष्यात अशा प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा एक तळ मुंबईत ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आपत्कालीन स्थितीत संपूर्ण पश्चिम भारतासाठी या तळाचा वापर होणार असल्याने त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने मुंबईत दीडशे एकर जागेची मागणी केली होती; मात्र एवढी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नसल्याने मुंबई पोलिसांच्या अंधेरीत मरोळ येथे असलेल्या शंभर एकर जागेपैकी अवघी 23 एकर जागा या तळासाठी देण्यात आली. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी या तळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता या ठिकाणी अहोरात्र काम करण्यात येत होते. मरोळ येथील जागा मिळाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या काळात या ठिकाणी सुसज्ज असा तळ उभारण्यात आला असून या तळाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंना पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रसंगी पुढील प्रशिक्षणासाठी मनेसर येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाणार आहे. या तळाच्या उभारणीचे काम सुरू असताना या पथकाचे महासंचालक एनपीएस अलख यांनीही भेट दिली होती.
या तळाच्या उभारणीसाठी दीडशे एकर जागेची मागणी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलापुढे कल्याण, नवी मुंबई, डहाणू येथील जागांचे पर्याय ठेवण्यात आले होते; मात्र आपत्कालीन स्थितीत पश्चिम विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने हा तळ विमानतळाजवळच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही हा अधिकारी म्हणाला.
(sakaal,24th june)
No comments:
Post a Comment