Sunday, June 7, 2009

मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटचा छडा

सीबीआयची कारवाई ः 34 मुलींची सुटका; आठ जणांना अटक

चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने पश्‍चिम बंगाल, कोलकत्ता, आसाम, बांगलादेश येथून आणलेल्या मुलींची वेश्‍याव्यवसायासाठी अवघ्या काही हजार रुपयांना विक्री करणारे रॅकेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणले आहे. नवी मुंबई आणि चेंबूर परिसरात गेल्या अडीच वर्षांपासून हे रॅकेट चालविणाऱ्या आठ जणांना सीबीआयच्या पथकाने अटक केली असून या वेळी 34 मुलींची सुटका करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी काल (ता. 26) येथे दिली.

नवी मुंबईतील वाशी आणि चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात वेश्‍या व्यवसायाकरिता मुलींची विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने मुंबईतील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाशीतील हॉटेल कुबेर येथे 25 मे रोजी रात्री सापळा रचला. दोन सामाजिक कार्यकर्त्यांना "डमी' ग्राहक बनवून रॅकेटशी संबंधित असलेल्या लोकांसोबत दोन मुलींचा सौदा करण्यासाठी पाठविण्यात आले. दोन मुलींसाठी 21 हजार रुपये देत असतानाच सीबीआयच्या पथकाने तेथे छापा घातला. या वेळी वेश्‍या व्यवसायाकरिता आणलेल्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना वाशीच्या हॉटेल साईछत्र येथे नेले जाणार होते. हॉटेल कुबेरच्याच एका हॉलमध्ये एकोणीस मुली ठेवण्यात आल्या होत्या. या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या विठ्ठल पाटील (29), राजेंद्र सॉ (26), राजू नंजूगौडा (26) आणि महम्मद परवेझ अन्सारी (45) या चार दलालांना अटक केली. सुटका झालेल्या या मुलींच्या चौकशीत सिंधी कॉलनी येथील घरात आणखी काही मुली बंद असल्याचे कळले. या माहितीवरून सीबीआयच्या पथकाने तेथेही छापा टाकून नऊ मुलींची सुटका केली. सुटका झालेल्या 34 मुलींपैकी आठ मुली अल्पवयीन असल्याचे तपासात आढळले. मुलींना ठेवण्यासाठी स्वतःची जागा देणारी मालकीण जसबीर कौर (65), प्रमोद सॉ (35) तसेच मुलींची परराज्यांतून खरेदी करून आणणारे बिभाष रॉय (40) आणि त्याची पत्नी सम्पा रॉय (35) यांनाही अटक करण्यात आली आहे. जसबीर कौर हिच्याकडून मुलींनी वेश्‍याव्यवसायातून मिळविलेले चार लाख 79 हजार रुपये हस्तगत केले आहेत.
या तरुण मुलींना वाशीतील काही हॉटेल आणि लॉजमध्ये वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने आणून तेथे त्यांची विक्री केली जात असे. ग्राहकांकडून प्रत्येकी दहा ते चाळीस हजार रुपये घेऊन या मुलींना त्यांच्यासोबत पाठविले जायचे. ग्राहकाची भूक भागविल्यानंतर काही तासांनी परत येणाऱ्या या मुलींना पुन्हा हॉटेलमध्ये एकत्र करून त्यांना सिंधी कॉलनीतील एका घरात अतिशय अमानुषपणे ठेवले जात होते. वेश्‍याव्यवसायासाठी या मुलींचा वापर झाल्यानंतर त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन उरलेली रक्कम चारही दलाल स्वतःकडे ठेवून घेत. यापैकी कित्येक मुलींना या दलालांनी त्यांच्या पालकांकडूनच खरेदी करून वेश्‍याव्यवसायात आणल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासाकरिता सीबीआयचे पथक कोलकत्ता आणि आसाम येथे पाठविण्यात आल्याचेही ऋषिराज सिंग यांनी सांगितले.

(चौकट)

बाप की कसाई
सीबीआयच्या छाप्यात अटक करण्यात आलेला दलाल मोहम्मद परवेज अन्सारी याने स्वतःची मुलगी आणि पुतणीलाही अल्पवयीन असल्यापासूनच वेश्‍याव्यवसायात ढकलल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 2007 मध्ये एका छाप्यात पोलिसांनी त्याच्या मुलीची सुटका केल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने तिचा ताबा त्याच्याकडे देण्यास नकार दिला होता. कसेबसे मुलीला ताब्यात घेऊन त्याने तिला दोन वर्षे घरात ठेवले होते. मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला पुन्हा वेश्‍याव्यवसायात ढकलून तिच्या पैशावर तो उपजीविका करीत होता.

ब्ल्यू फिल्म्ससाठी वापर
चित्रपटात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने मुंबईत आणल्या जाणाऱ्या या मुलींचा ब्ल्यू फिल्म्ससाठी वापर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याच अनुषंगाने या रॅकेटमधील लोकांचे चित्रपटसृष्टीतही काही संबंध आहेत का, हेदेखील पडताळून पाहिले जात असल्याचे सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले.

(sakaal, 27th may )

No comments: