Saturday, June 13, 2009

बॅंका लुटणाऱ्या टोळीतील दोघे जण पोलिस चकमकीत ठार

नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाचीही केली होती हत्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील बड्या बॅंका आणि सराफांच्या दुकानांवर दरोडे घालणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या अशोक जीवनी आणि त्याचा साथीदार गिरधारी पोटे या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळा येथे चकमकीत ठार मारले. ऐरोलीच्या पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवरील दरोड्याच्या वेळी याच टोळीने बाबासाहेब आढाव या पोलिस उपनिरीक्षकाची हत्या केली होती. या टोळीने राज्यभरात पस्तीसहून अधिक दरोडे घातल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.

वडाळा पूर्वेला असलेल्या अभ्युदय बॅंकेसमोर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. दरोड्याच्या सहा गंभीर गुन्ह्यांत मुंबई पोलिसांना हवा असलेला अशोक जीवनी आणि त्याचा साथीदार गिरधारी पोटे अभ्युदय बॅंकेवर दरोडा घालण्यासाठी बॅंकेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून जीवनी आणि पोटे या दोघांना शरण येण्यास सांगितले; मात्र दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले.

मुंबई आणि परिसरातील बॅंका व सराफांच्या दुकानांवर दरोडे घालण्यात तरबेज असलेली जीवनी याची टोळी 1992 पासून कार्यरत होती. याच टोळीने तीन वर्षांपूर्वी ऐरोलीच्या पंजाब महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा घालताना बाबासाहेब आढाव नावाच्या पोलिस उपनिरीक्षकाला ठार मारले होते. या टोळीने मुंबई, नवी मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरांत घातलेल्या उच्छादामुळे पोलिस दलही हैराण झाले होते. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टोळीच्या शिवा गौडा, घिसू मारवाडी आणि बाबू पुजारी या तिघा दरोडेखोरांना सीबीडी येथे चकमकीत ठार मारले होते; तर या टोळीचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्‍या रमेश उपाध्याय आणि त्याचा साथीदार चंद्रा शेट्टी या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत ठार मारले होते. 1995 मध्ये याच टोळीचा सदस्य असलेल्या कट्टा शेखर याला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी माझगाव न्यायालयात भरदिवसा गोळीबार करून त्याला पळवून नेले होते. यानंतर या टोळीच्या या परिसरातील कारवाया थंडावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टोळीचा म्होरक्‍या अशोक जीवनीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. आज पहाटे तो साथीदारांसोबत वडाळा येथे येताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला चकमकीत ठार मारले. या टोळीच्या कारवाया गुजरात व कर्नाटक या राज्यांतही सुरू होत्या, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.


(sakaal, 13 th june)

No comments: