Monday, June 29, 2009

अतिताणामुळे महिन्याला तीन पोलिस बळी!

साडेतीन वर्षांत 118 अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराने मृत

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत असतानाच कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड ताणामुळे दर महिन्याला मुंबई पोलिस दलातील सरासरी तीन पोलिस अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावत असल्याची धक्कादायक आकडेवारी "सकाळ'ला उपलब्ध झाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत विविध आजार, व्याधी व कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या 516 पोलिसांपैकी तब्बल 118 पोलिस फक्त हृदयविकाराने मरण पावले आहेत.
कामाच्या अनियमित वेळा, सततचा बंदोबस्त व आवश्‍यकतेप्रमाणे रद्द होणाऱ्या रजा अशा वातावरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी काम करताना दिसतात. अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या किमान 12 तासांच्या नोकरीमुळे पोलिसांना अनेकदा तणावाखाली काम करावे लागते. त्यातच धूम्रपान व मद्यपानासारख्या जडणाऱ्या व्यसनांमुळे या पोलिसांना आजारपणही कवटाळत असल्याचे दिसते. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात मुंबई पोलिस दलातील 516 पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध आजार आणि व्याधींनी मरण पावले आहेत. त्याखालोखाल क्षयरोगाने मरण पावणाऱ्या पोलिसांची संख्याही लक्षणीय आहे. गेल्या साडेतीन वर्षांत क्षयरोगाने 61 पोलिस मृत्युमुखी पडले. एड्‌समुळे चार, कर्करोग- 19, किडनी- 27, कावीळ- 41, अपघाती मृत्यू- 59, अर्धांगवायू- सात व मधुमेह- 18 अशी इतर आकडेवारी आहे. तणावाखाली येऊन 14 पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दीर्घकालीन आजाराने 21 पोलिस दगावले आहेत.
नियमित व्यायाम आणि कवायतींद्वारे आरोग्य चांगले राखण्याकडे पोलिसांचा कल असतो. "बॉडी मास्क इंडेक्‍स'प्रमाणे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या पोलिसांना दरमहा 250 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे प्रकर्षाने कल असल्याचे चित्र आहे; मात्र पोलिस दलात अनेक वर्षे सेवा झालेले अधिकारी व कर्मचारी नियमित कवायती आणि सर्वसाधारण व्यायामालाही काही वेळा दांडी मारताना दिसतात.

सर्व पोलिसांची वैद्यकीय चाचणी होणार
ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलिस हवालदार ज्योतिराम येडेकर यांचा संशयित आरोपींचा पाठलाग करताना बुधवारी (ता. 24) पहाटे हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनीदेखील पोलिसांच्या आरोग्यासंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली असून, येत्या 15 दिवसांच्या काळात मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांना केईएम रुग्णालय आणि लिंटास कंपनीचे सहकार्य मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला असलेल्या आरोग्यविषयक समस्येचे प्राथमिक अवस्थेतच निदान झाल्यास त्याला चांगल्या वैद्यकीय सुविधा देऊन आजाराचे उच्चाटन करता येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


-------------



इन्फो...
वर्ष - मृत पोलिसांची संख्या
2006 - 158
2007 - 137
2008 - 167
2009 (मेअखेर) - 54



पोलिस रुग्णालयाचाही बदलणार चेहरामोहरा

नागपाडा येथील पोलिस रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी पावले उचलली आहेत. ठाणे येथील पोलिस रुग्णालय "वोक्‍हार्ट' या खासगी रुग्णालयाला चालवायला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील नागपाडा येथील पोलिस रुग्णालयही खासगी रुग्णालयाला देण्याचे प्रस्तावित आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने हे रुग्णालय खासगी रुग्णालयाला चालवायला दिले जाणार आहे. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे


(sakaal,25th june)

No comments: