Monday, June 29, 2009

बेहरामपाड्यातील भीषण आगीत चारशे झोपड्या खाक

लहान मुलगा ठार; 22 रहिवासी जखमी

वांद्रे येथील बेहरामपाड्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत सुमारे चारशे झोपड्या आणि लाकडाच्या वखारी जळून भस्मसात झाल्या. आज पहाटे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सात महिन्यांचे बाळ ठार झाले, तर 22 जण जखमी झाले. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या अवैध बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी पोचण्यास अडचणी येत होत्या. चोख पोलिस बंदोबस्तात सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीत जखमी झालेल्यांना भाभा व व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.
वांद्रे पूर्वेला ए. के. मार्ग पोलिस चौकीसमोर असलेल्या बेहरामपाड्यात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका झोपडीत असलेल्या चहाच्या टपरीतील एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या या विभागात राजकीय वरदहस्तामुळे मोठ्या प्रमाणावर लाकडी वखारी आणि झोपड्यांचे अवैध बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक रहिवासी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि हातात मिळतील त्या जीवनावश्‍यक वस्तू घेऊन झोपड्यांबाहेर पळाले. काही नागरिकांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर अग्निशमन दलाचे 12 फायर इंजिन आणि 10 वॉटर टॅंकरनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या बंबांना आग विझविण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. आग विझविण्यासाठी एरियल लॅडर व्हेईकल व जम्बो टॅंकरचाही वापर करण्यात येत होता. आपला संसार नजरेसमोर भस्मसात होत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी अग्निशमन बंबांनाच अडथळा निर्माण करायला सुरुवात केली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी आगीच्या ठिकाणापासून दूर करायला सुरुवात केली. तोच काही झोपड्यांत असलेल्या गॅस सिलिंडर्सचा पुन्हा स्फोट झाला. यानंतर मात्र जीव वाचविण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली.

14 गॅस सिलिंडरचा स्फोट
बेहरामपाड्यात एक व दोन मजल्यांच्या घरांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या घरांत मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग व खाणावळी चालविल्या जात होत्या. या आगीत एकूण 14 एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझविण्याकरिता पाण्याचा अपूर्ण पुरवठा होत असल्याने नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील अग्निशमन दलांच्या बंबांनाही मदतीसाठी बोलाविण्यात आले. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत 25 फायर इंजिन, 16 पाण्याचे टॅंकर आणि चार रुग्णवाहिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे काम सुरू होते. सकाळी या परिसरात बघ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. तब्बल पंधरा तासांनंतरही ही आग विझविण्याचे काम सुरूच होते.

मृत मुलाची ओळख नाही
आगीत मरण पावलेल्या सात महिन्यांच्या बाळाची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमी झालेल्या 22 जणांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 17 जणांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. कलिम हैदर हुसेन (36), महम्मद सलीम शकील (14), अल्ताफ शेख (28), क्षमा अन्सारी (20) आणि महम्मद शकील दैहर हुसेन (32) हे जखमी भाभा व व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-------------
इन्फोबॉक्‍स...
तात्पुरत्या निवाऱ्याची सोय
"आगीत चारशेहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. झालेल्या वित्तहानीचा पंचनामा करण्यात येत असून, बेघर झालेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे,' अशी माहिती परिमंडळ-आठचे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली. "बेहरामपाड्यात असलेल्या एकूण झोपड्यांपैकी फक्त पन्नास ते साठ झोपड्याच अधिकृत आहेत,' अशी माहिती महापालिकेच्या एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उमाशंकर मिस्त्री यांनी "सकाळ'ला दिली.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असलेल्या अवैध बांधकामांमुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यास मोठ्या प्रमाणात अडथळे आल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली.



(sakaal,18th june)

No comments: