Sunday, June 7, 2009

दोन विमानांची धडक टळली..!

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून उड्डाण घेण्यासंबंधी मिळालेल्या सूचनांबाबत गफलत झाल्याने आज सकाळी दोन विमानांची समोरासमोर धडक लागून होणारा मोठा अपघात केवळ पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला. अगदी शेवटच्या क्षणी पायलटने ब्रेक दाबल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर दोन्ही विमानांत असलेल्या दोनशेहून अधिक प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन मार्फत आज काढण्यात आले आहेत.
मुंबई विमानतळावर सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. विमानतळाच्या धावपट्टीवरून जेट एअरवेजचे मुंबईहून कोलकत्यासाठी जाणारे विमान उड्डाण घेणार होते. या विमानात 120 प्रवाशी आणि चार लहान मुलांचा समावेश होता. याचवेळी 104 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे 348 क्रमांकाचे मुंबई - दिल्ली - शांघाय हे विमानही उड्डाण घेणार होते. या दोन्ही विमानांना हवाई वाहतूक नियंत्रित ठेवणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून उड्डाणाच्या सूचनाही देण्यात आल्या. दोन्ही विमानांना उड्डाणासंबंधी मिळालेल्या हिरव्या सिग्नलमुळे त्यांच्या पायलटनी विमानांचे इंजिन सुरू केले. यानंतर ही दोन्ही विमाने एकमेकांसमोर येऊन टेकऑफ घेणार तोच जेट एअरवेजच्या पायलटच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने अगदी शेवटच्या क्षणी ब्रेक दाबून पुढील अनर्थ अक्षरशः टाळला. अचानक झालेल्या या घटनेनंतर दोन्ही विमानांत बसलेल्या शेकडो प्रवाशांचे जणू तोंडचे पाणीच पळाले. यानंतर या दोन्ही विमानांची उड्डाणे काही काळ थांबविण्यात आली. दोन्ही विमाने धावपट्ट्यांवर तिरक्‍या रेषेत होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सने आपल्या विमानाला उड्डाण घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. मात्र, ऐन वेळी हे उड्डाण थांबविण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर आपल्या पायलटला धावपट्टी क्रमांक 14-32 वरून उड्डाण घेण्याच्या स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या. हा संदेश आपल्यासाठीच असल्याचे समजून एअर इंडियाच्या विमानावर असलेल्या पायलटने मुख्य धावपट्टी क्रमांक 9-27 वरून उड्डाण घेण्यास सुरुवात केल्याचे जेट एअरवेजच्या प्रवक्‍त्यांचे म्हणणे आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स विभागाकडून या घटनेसंबंधी प्रतिक्रिया देण्याकरिता कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.
दरम्यान, मुंबई विमानतळावर दोन विमानांची एवढी मोठी घटना टळल्यानंतर डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशनने (डीजीसीए) या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेले कॉकपिट वॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डाटा रेकॉर्डरची पडताळणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांच्यात झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग यात उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यातूनच या घटनेला जबाबदार असलेल्यांचा शोध घेता येणार असल्याचे डीजीसीएतील सूत्रांनी सांगितले. जेट एअरवेजच्या विमानाला उड्डाणाचे निर्देश मिळाले असताना एअर इंडियाच्या पायलटने उड्डाण घेण्याची घाई का करावी, याचाही तपास केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.


(sakaal,31st may)

No comments: