Sunday, June 7, 2009

गृहरक्षक दलाचे जवान भत्त्यांपासून वंचित

चार महिने हाल; सरकारकडून अपुरा निधी

आपत्कालीन स्थिती, दंगल, उत्सव बंदोबस्त तसेच निवडणूक काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गृहरक्षक दलाचे जवान गेल्या चार महिन्यांपासून मासिक भत्त्यांपासून वंचित आहेत. राष्ट्रकार्याच्या नावाखाली अक्षरशः राबविल्या जाणाऱ्या या जवानांना सरकारकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे भत्त्यांसाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते.

आपत्कालीन स्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था म्हणून गृहरक्षक दलही काम करते. पोलिसांसोबतच अहोरात्र काम करणारे हे जवान मात्र गरज संपल्यानंतर अनेकदा दुर्लक्षिले जातात. राज्यात असलेल्या 42 हजार 948 गृहरक्षक दलाच्या जवानांपैकी साडेसहा हजार जवान फक्त मुंबईत कार्यरत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने या शहरातील पोलिसबळ अपूर्ण असल्याने प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडींच्या वेळी पोलिसांना गृहरक्षक दलाचीच मदत घ्यावी लागते. उत्सवांचे बंदोबस्त, वाहतूक नियमन, रेल्वे सुरक्षा आदी महत्त्वाचे बंदोबस्त गृहरक्षक दलावर सोपविले जातात. या जवानांच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना दिवसाला दोनशे रुपये भत्ता देण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत घेतला. यापूर्वी त्यांना दिवसाला नव्वद रुपये भत्ता दिला जात असे. समाजकार्याची आवड असलेल्यांनी त्यांची नेहमीची कामे सांभाळून स्वयंसेवी तत्त्वाने केवळ राष्ट्रकार्य म्हणून या दलात सहभागी होण्याची यापूर्वीची संकल्पना होती. मात्र, वाढती बेरोजगारी तसेच पोलिस भरतीत ठेवण्यात आलेले पाच टक्के आरक्षण यामुळे या दलाकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर ओढला गेला. यात अल्प उत्पन्न गट तसेच झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे.
सरकारने या जवानांच्या भत्त्यात केलेल्या भरघोस वाढीनंतर गृहरक्षक दलात काम करणाऱ्या या जवानांचा हुरूप वाढला. मात्र, सुधारित भत्ता मिळण्यासाठी या जवानांना तब्बल पाच महिने वाट पाहावी लागली. गृहरक्षक दलाच्या जवानांना सप्टेंबरपासूनचा भत्ता जानेवारी महिन्यात देण्यात आला. फेब्रुवारीपासून आजतागायत या जवानांना दैनंदिन कामाचा भत्ताच मिळालेला नाही. त्यामुळे अनेकदा अतिसामान्य कुटुंबातून आलेल्या या जवानांत नाराजीचा सूर आहे.
या जवानांच्या भत्त्यात करण्यात आलेल्या भरघोस वाढीमुळे प्रशासनामार्फत सरकारकडे अनेकदा मागणी करूनही भत्त्यासाठीचा निधी पूर्ण उपलब्ध होत नाही. यापूर्वी वर्षांला 42 कोटी रुपयांचे असलेली आर्थिक तरतूद नव्वद कोटींपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे जवानांना भत्ते देताना अडचणी येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गृहरक्षक दलातील जवानांच्या भत्त्यासाठी सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध होत आहे. त्यानुसार राज्यभरात असलेल्या जवानांना भत्त्यांचे वितरण केले जात असल्याची माहिती या दलाचे उपमहासमादेशक बी. एन. राऊत यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. यंदा लोकसभा निवडणूक काळातही राज्यभरात 36 हजार गृहरक्षक दलाचे जवान सेवेवर होते. त्यांना या कालावधीसाठी आगावू भत्ते देण्यात आले. मुंबईत कार्यरत असलेल्या जवानांना काही तांत्रिक अडचणींमुळे दैनंदिन भत्त्यांचे वितरण लांबले आहे. जवानांना हे भत्ते मिळण्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.


(sakaal, 1st june)

No comments: