Saturday, June 13, 2009

पद्मसिंह पाटलांसारख्या व्यक्ती अतिरेक्‍यांपेक्षाही धोकादायक - हजारे

तेरणा सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार बाहेर काढल्यामुळेच खासदार पद्मसिंह पाटील यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली असावी, असा संशय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या व्यक्ती पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असतात. त्यांना कायम तुरुंगात ठेवले पाहिजे, असेही हजारे या वेळी म्हणाले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हजारे यांना पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी बोलावल्यानंतर ते प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते.
तेरणा सहकारी साखर कारखान्यात सुरू असलेला गैरव्यवहार बाहेर काढल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पद्मसिंह पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले; याशिवाय उस्मानाबाद जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारही आपण बाहेर काढला होता. याच रागातून त्यांनी आपल्या हत्येची सुपारी पारसमल जैन याला दिली असावी, असेही अण्णा हजारे या वेळी म्हणाले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तेरणा सहकारी साखर कारखाना व जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारासंबंधी माहिती देण्यासाठी आपण आलो होतो. आपल्या हत्येची सुपारी देणाऱ्यांविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करण्याची विनंतीही "सीबीआय'कडे केली आहे. सीबीआय कोणत्याही दबावाशिवाय काम करीत आहे, असे सांगत हजारे यांनी "सीबीआय'ला जे जमले, ते राज्य पोलिसांना का नाही जमले, असा सवालही हजारे यांनी या वेळी केला. "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांकडून कुलाबा येथील तन्ना हाऊसमधील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, निंबाळकर हत्येच्या तपासाला विलंब लावल्याप्रकरणी; तसेच उपलब्ध पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि तपासासंबंधी त्यांच्या असलेल्या भूमिकेच्या चौकशीची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. "सीबीआय'चे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने आताच काहीही सांगणे उचित नसल्याचे सांगितले.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पारसमल जैन याच्या चौकशीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला. अण्णा हजारे यांनी तेरणा सहकारी साखर कारखान्यात झालेला गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यामुळेच आरोपी सतीश मंदाडे आणि नगरसेवक मोहन शुक्‍ला यांनी हजारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची शक्‍यता वर्तवीत "सीबीआय'ने त्यांना त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी तन्ना हाऊसमधील कार्यालयात आज सायंकाळी पाचच्या सुमारास बोलावले. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत अण्णांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना आज किताबमहल येथील कार्यालयात ठेवण्यात आले असून त्यांची आजही "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.


तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी
निंबाळकर हत्या प्रकरणाच्या तपासात ढिलाई करणाऱ्या नवी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन अधिकाऱ्यांचीही चौकशी "सीबीआय'मार्फत केली जाणार आहे. 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या घटनेच्या वेळी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर विजय कांबळे होते. गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त शशिकांत महावरकर, परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त प्रवीण पवार, पनवेल विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विजय सूर्या, कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. वाय. गलधर आणि बी. आर. पाटील हे अधिकारी नवी मुंबईत कार्यरत होते. या अधिकाऱ्यांपैकी विजय सूर्या सेवानिवृत्त झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी निंबाळकर हत्येप्रकरणी केलेल्या तपासाची आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्‍यताही "सीबीआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली. मात्र, "सीबीआय'चे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. योग्य वेळी यासंबंधी संपूर्ण माहिती प्रसिद्धिमाध्यमांपुढे सांगण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


(sakaal,9th june)

No comments: