Monday, June 29, 2009

अमलीपदार्थ व्यापाऱ्याविरोधात प्रसंगी कायद्यात बदल करू

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

अमलीपदार्थांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी सरकार ध्येयनिष्ठ असून पोलिसांनी असा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अमलीपदार्थांबाबत तरुणांत जागरूकता आणण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले. अमलीपदार्थविरोधी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असून आवश्‍यक तर यासाठी कायद्यातही बदल करू, असे सांगतानाच ही जागतिक समस्या असून त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन होऊन तोडगा काढायला हवा, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.
जागतिक अमलीपदार्थ दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी तरुण पिढीत अमलीपदार्थांच्या वाढत्या व्यसनाधिनतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सामाजिक संस्थांनी समाजप्रबोधनाद्वारे व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यास हातभार लावण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी मुंबई महानगरातील अमलीपदार्थांच्या व्यापाराचे समूळ उच्चाटन करण्याचे व सामाजिक आरोग्य अबाधित राखण्याचे आश्‍वासन दिले.
"अमलीपदार्थांची नशा-दशा आणि दिशा' या विषयावर झालेल्या परिसंवादात गृहराज्यमंत्री नसीम खान, डी. शिवानंदन, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक डॉ. एच. परशुरामन, अभिनेता नील मुकेश आदींनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अभिनेत्री कांचन धर्माधिकारी यांनी केले. के. पी. रघुवंशी यांनी अमलीपदार्थांचा व्यापार आणि दहशतवाद यांच्या आपसातील संबंधांवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अमलीपदार्थांचा आंतरराष्ट्रीय व्यापार व दहशतवाद तसेच भारतीय संस्कृती आणि युवा पिढी या विषयावर प्रबोधन केले.
अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(sakaal, 26 th june)

No comments: