Sunday, June 7, 2009

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब

आजपासून हजर राहण्याचे आदेश

राज्य पोलिस दलातील बारा आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्तपदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर गृहखात्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी या अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश गृहखात्याकडून काढले जाणार आहेत.
आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांची नाशिक येथून मुंबईत दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. या ठिकाणी असलेले डॉ. के. व्यंकटेशन यांची नेमणूक पोलिस मुख्यालयात प्रशासन विभागाच्या उपमहानिरीक्षकपदावर केली जाणार आहे. परिमंडळ -11 चे पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजय बॅनर्जी यांची नियुक्ती झाली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक प्रताप दिघावकर यांची नवी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून काही काळ काम पाहिलेले आर. डी. शिंदे यांची नेमणूक केली जाणार आहे. आयपीएस अधिकारी म्हणून बढती मिळाल्यानंतर शिंदे यांनी नवी मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाचा पदभार सोडला होता. याशिवाय नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीण पवार यांची राज्य उत्पादनशुल्क विभागात झालेल्या बदलीनंतर येथील गुन्हे शाखेचे उपायुक्तपदही रिकामे होते. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही दोन्ही पदे तातडीने भरण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. मुंबईत गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्त पदावर काम केलेले दत्ता शिंदे यांची नवी मुंबईत पोलिस उपायुक्तपदावर वर्णी लागणार आहे. मुंबईत मद्यपी वाहनचालकांवर कारवायांची धडक मोहीम हाती घेणारे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हरीश बैजल यांची नाशिक येथे बदली झाली आहे. ऑर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षक स्वाती साठे यांची देखील नाशिक येथे बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या 200 अधिकाऱ्यांच्या बदल्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. यात मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेत नेमणुका असलेल्या अ
धिकाऱ्यांची संख्या अधिक आहे.
शनिवारी या बदल्यांना गृह विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली. यासंबंधीचे अधिकृत आदेश सोमवारी निघणार असल्याची माहिती गृहखात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.


(sakaal,31 th may)

No comments: