Monday, June 29, 2009

बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर

अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती इंटरनेटवर देणार

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंतच्या बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणि समानता आणण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत असून त्याद्वारे राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती तसेच त्याचे सेवापुस्तकच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात दिली.

वाकोला येथे मुंबई पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या 1496 प्रशिक्षणार्थींचे वसतिगृह आणि 324 पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना कित्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या आवडीच्या तसेच सोयीच्या ठिकाणी बदल्या होण्यासाठी प्रयत्नशील असतात यावर त्यांनी लक्ष वेधले. गडचिरोली, गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिसांचे बदलीसंबंधीचे विनंती अर्ज अनेकदा कागदावरच राहतात; तर मुंबईसारख्या शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखीने त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग घेता येते. बदल्यांच्या कामात समानता नसल्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या पोलिसांचा आवाज दबला जातो. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निर्धारित कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या संभाव्य बदल्यांची ठिकाणे तसेच त्यांनी केलेल्या विनंतीची ठिकाणे असा "प्लेसमेंट चार्ट' इंटरनेटवर उपलब्ध केला जाणार आहे. या चार्टमध्ये या अधिकारी व कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती, आजवर त्यांनी बजावलेली विशेष कामगिरी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची खडान्‌ खडा माहिती अवघ्या एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणताना लहानात लहान कर्मचाऱ्याची विनंतीही लक्षात घेतली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने तयार केले जाणारे हे सॉफ्टवेअर येत्या चार महिन्यांत कार्यान्वित केले जाणार आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा डी. शिवानंदन यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आपल्याला मुंबई पोलिसांकडून "परफॉर्मन्स' हवा आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला पुन्हा झाल्यास तो हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिस दल अधिक सक्षम असावे, असेही पाटील या वेळी म्हणाले.

राज्यात नक्षलवादाचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र होत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये माओवादी चळवळीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. गडचिरोली, गोंदियासारखा भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतील. येत्या काळात या प्रश्‍नावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या ठिकाणी पोलिस दल अधिक सशक्तपणे काम करीत असल्याचेही गृहमंत्री या वेळी म्हणाले.

मुंबईसारख्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्‍यक अधिकारी, शस्त्रास्त्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याकरिता हेलिकॉप्टरची आवश्‍यकता असून हे हेलिकॉप्टर नवी मुंबई आणि ठाण्यासाठीही वापरता येईल असेही ते म्हणाले.

पोलिस आयुक्तांसाठी बंगला
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या अधिकाऱ्यासाठी 1873 पासून बंगला आहे; मात्र राज्याचे पोलिस महासंचालक तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकरिता बंगले नाहीत. या अधिकाऱ्यांच्या पदाला असलेले महत्त्व आणि मान यांचा विचार करता त्यांच्यासाठीही मुंबईत चांगल्या ठिकाणी बंगले उभारण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल, असेही गृहमंत्री पाटील या वेळी म्हणाले.



(sakaal,23rd june)

No comments: