Sunday, June 7, 2009

पाणी मागणाऱ्या मुलीवर गरम पावभाजी फेकली

दादरच्या हॉटेल कामतमधील अघोरी प्रकार; नोकराला अटक

खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरच्या हॉटेल कामतमध्ये पिण्याचे पाणी मागायला गेलेल्या एका आठ वर्षीय मुलीच्या अंगावर तेथील नोकराने गरम पावभाजी टाकल्याचा अमानुष प्रकार आज दुपारी घडला. गरम पावभाजी पायावर पडल्याने जखमी झालेल्या या मुलीला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर नोकरावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक केल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.
फुलांची विक्री करणारी गंगा गोरखनाथ काळे ही मुलगी जवळच असलेल्या हॉटेल कामतमध्ये पाणी मागण्यासाठी गेली होती; मात्र हॉटेलमधील नोकर शेंटू शंकर नाथ (24) याने तिला पाणी देण्यास नकार दिला. तहानेने व्याकूळ झालेल्या गंगाने पुन्हा एकदा पाण्यासाठी विनवणी केली. या वेळी शेंटू नाथ याने तव्यावरील गरम पावभाजी तिच्या अंगावर टाकली. पावभाजीच्या चटक्‍यांमुळे वेदना असह्य झाल्याने गंगाने आक्रोश केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने जवळच फुलांची विक्री करणारी तिची चुलतबहीण आणि अन्य एक महिला हॉटेलसमोर आल्या. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे या कृत्याचा जाब विचारायला सुरुवात केली. हॉटेलबाहेर आरडाओरड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलकडे धाव घेतली. त्यांनी लगेचच गंगाला केईएम रुग्णालयात पाठविले; तर तिच्या अंगावर गरम पावभाजी टाकणारा नोकर शेंटू शंकर नाथ याला अटक केली. उपचारानंतर गंगाला घरी पाठविण्यात आले. तिच्या गुडघ्याखाली जबर जखम झाल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.
आपली बहीण हॉटेलमध्ये केवळ पाणी मागण्यासाठी गेली होती; मात्र नोकराने तिला पशूसारखी वागणूक दिली, असे गंगाची मोठी बहीण संगीता काळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
------------
चौकट

पोलिसांचे कानावर हात
या घटनेनंतर अधिक माहिती घेण्यासाठी दादर पोलिस ठाण्यात गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तेथील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर थोरात यांनी हात वर करीत आमच्याकडे अशा कोणत्याही घटनेची नोंद नसल्याचे सांगितले. आपण स्वत: दिवसभर येथे बसलो आहोत. यासंबंधी त्यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशी करण्यास सांगितले. या वेळी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, अशी कोणतीही घटना आमच्याकडे दाखल नसल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनाक्रमाच्या वेळी दादर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उंडे हजर नव्हते. ते येईपर्यंत प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी गर्दी केली होती. जखमी गंगाला पोलिस ठाण्याच्याच मागील बाजूला असलेल्या खोलीत ठेवण्यात आल्याचे कळताच प्रसारमाध्यमांनी तेथे धाव घेतली. या वेळी तिची छायाचित्रे काढण्यास पोलिसांनी मज्जाव केला. दोन तासांनी पोलिस ठाण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक उंडे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.
-----------------------------------


(sakaal,2nd june)

No comments: