Monday, June 29, 2009

... तर अधिकाऱ्यांनो खुर्ची सोडा!

पोलिस आयुक्तांचा इशारा

पोलिस अधिकाऱ्यांनो कामगिरी दाखवा आणि कामगिरी दाखविणे शक्‍य नसेल, तर खुर्ची सोडा, असा सणसणीत इशारा पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिला आहे. सामान्य नागरिकांत पोलिसांची प्रतिमा उंचावण्याकरिता पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला चांगली वागणूक देण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचाही सल्ला शिवानंदन यांनी दिल्याचे समजते.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर आज डी. शिवानंदन यांनी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना येत्या काळात अधिक चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या अधिकाऱ्यांना चांगले काम करणे शक्‍य नसेल, त्यांनी तातडीने खुर्च्या सोडाव्यात, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि प्रश्‍नांना अग्रक्रम देण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांबाहेर अमली पदार्थांचे वितरण करणारी रॅकेटस्‌ नेस्तनाबूत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये झालेल्या या गुन्हे आढावा बैठकीला कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


---------

पोलिस उपनिरीक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

विधिमंडळ अधिवेशनाचा बंदोबस्त उरकून घरी परतणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना अंधेरी आणि विलेपार्ले रेल्वेस्थानकादरम्यान मध्यरात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दहिसर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलिस उपनिरीक्षक अनिल सावंत (54) गेल्या आठवड्यापासून विधानसभा अधिवेशनाच्या बंदोबस्तावर होते. काल रात्री उशिरा बंदोबस्त उरकून ते त्यांच्या पेणकरपाडा, दहिसर येथील घरी जात होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले ते अंधेरी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या रेल्वेरूळावर ते जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. काही प्रवाशांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सावंत यांना कूपर रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्‍टरांनी घोषित केले. रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती दहिसर पोलिस; तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कळविली. सावंत यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार उपनिरीक्षक सावंत यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली. सावंत यांच्या मृतदेहावर पेणकरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले


(sakaal,17 th june)

No comments: