Saturday, June 13, 2009

नक्षलवादविरोधी मोहिमेच्या महासंचालकपदी जयंत उमराणीकर

गृहमंत्री जयंत पाटील यांची विधानसभेत घोषणा

नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेच्या महासंचालकपदावर जयंत उमराणीकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. उमराणीकर यांना पदोन्नती देऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. उमराणीकर यांच्या नियुक्तीनंतर नक्षलवादविरोधी पथकाला पहिल्यांदाच पोलिस महासंचालकपदाचा अधिकारी प्राप्त झाला आहे.

राज्यातील गडचिरोली, चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कारवायांना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. गेल्या महिन्यात गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा पोलिस शहीद झाले. अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच आठवड्यात गृहमंत्री जयंत पाटील व पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक या नक्षलग्रस्त राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेचे नेतृत्व पूर्णवेळ पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असावे यासाठीच राज्य सरकारने आज या पदावर जयंत उमराणीकर यांची नेमणूक केली. उमराणीकर यापूर्वी पोलिस प्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर कार्यरत होते. पदोन्नती देऊन त्यांची
नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेच्या महासंचालकपदावर नेमण्यात आले आहे.

"फोर्स वन'चे विकेंद्रीकरण
विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली. गडचिरोली भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्यावर विस्तृत चर्चा झाली. नक्षलवादविरोधी पथकाचे सध्या नागपूरला असलेले कार्यालय गडचिरोली येथे स्थलांतरित करण्यासह सरकारतर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली. आजच्या चर्चेत पाटील यांनी उमराणीकर यांच्या नावाची घोषणा करून पोलिसांच्या "फोर्स वन' विभागाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णयही जाहीर केला. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी अव्याहतपणे काम करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून पोलिसांसाठी येणारा निधी खर्च करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आश्‍वासनही पाटील यांनी दिले.

वादग्रस्त उमराणीकर
भारतीय पोलिस सेवेच्या 1973 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या जयंत उमराणीकर यांची कारकीर्द गेल्या काही वर्षांत वादग्रस्त ठरली. यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलेल्या उमराणीकर यांच्यावर पोलिसांच्या सिक्रेट सर्विस फडांतील पैशांचा अपहार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उमराणीकर यांची पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पावसाळी अधिवेशनात नामुष्की टाळण्यासाठी राज्य सरकारने 16 जुलै 2008 रोजी त्यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केली होती. उमराणीकर यांनी यापूर्वी औरंगाबाद, नागपूर, जळगाव, ठाणे आणि सातारा येथेही काम केले आहे.



(sakaal,12 th june)

No comments: