Sunday, June 7, 2009

शिक्षिकेचे अश्‍लील प्रोफाईल; दोन विद्यार्थ्यांना अटक

इंटरनेटवर शाळेतील शिक्षिकेचे अश्‍लील प्रोफाईल तयार करणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी बोरिवली येथून अटक केली. या मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
बोरिवली पश्‍चिमेला असलेल्या एका शाळेत शारीरिक शिक्षण हा विषय शिकविणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून त्या दोघांनी शिक्षिकेचेच अश्‍लील प्रोफाईल ऑर्कुटवर टाकले. मार्च महिन्यात ही बाब उघडकीस आल्यानंतर या शिक्षिकेने गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हे प्रोफाईल काढून टाकले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना हे प्रोफाईल तिच्याच शाळेत शिकणाऱ्या 14 आणि 15 वर्षे वयोगटातील दोघा विद्यार्थ्यांनी तयार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आज दुपारी या दोघा विद्यार्थ्यांना त्यांच्या बोरिवली येथील घरातून ताब्यात घेऊन अटक केली. या दोन्ही मुलांचे पालक अतिशय उच्चशिक्षित असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.


(sakaal,2nd june)

No comments: