Monday, June 29, 2009

राज्यातील साडेसहा हजार गावे तंटामुक्त घोषित



तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर


गावपातळीवर सौहार्दपूर्ण आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करून त्याद्वारे गावात आपापसांत असलेले तंटे सोडविण्यासाठी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत सहभागी झालेल्या राज्यातील 27 हजार गावांपैकी यंदा साडेसहा हजार गावांना स्वयंमूल्यमापनानुसार तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. यंदा गावातील तंटे सामोपचाराने मिटविणाऱ्या जिल्ह्यांत लातूर आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गावपातळीवर छोट्या छोट्या कारणांवरून उद्‌भवणाऱ्या वादांचे मोठ्या तंट्यात पर्यवसान होऊन आर्थिक आणि जीवितहानी होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अतिशय लहान लहान कारणांतून निर्माण होणाऱ्या या तंट्याबाबत गावातील जाणत्या मंडळींनी वेळीच हस्तक्षेप केल्यास होणारी संभाव्य हानी टळू शकते. एकमेकांविषयी असलेला राग आणि मत्सर सामंजस्याने सोडविल्यामुळे गावातील वातावरणही खेळीमेळीचे राहते. याच बाबींचा विचार करून दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेद्वारे गावातील जनतेत जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून तंटामुक्त होणाऱ्या गावांना सरकारद्वारे गौरविण्यात येते. तंटामुक्त होणाऱ्या गावांना एक ते दहा लाख रुपयांची पारितोषिके दिली जातात.
यंदा या मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी राज्यातील बहुसंख्य गावांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या वर्षी राज्यातील 27 हजार 390 गावांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून जिल्हा मूल्यमापन समित्यांना 6500 गावांनी तंटामुक्त असल्याचे अहवाल सादर केले आहेत. या गावांचे जिल्हांतर्गत समित्यांकडून 10 ते 25 जूनदरम्यान मूल्यमापन झाले आहे. 20 जुलैपूर्वी या समित्या त्यांचे मूल्यमापन अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर करतील. याच गावांतून राज्य सरकार तंटामुक्त गावांची घोषणा करणार आहे. गेल्या वर्षी या मोहिमेत सहभागी झालेल्या 27 हजार 474 गावांपैकी 2328 गावांना सरकारने तंटामुक्त गाव म्हणून घोषित केले होते. महसुली, दिवाणी व फौजदारी अशा दोन लाख 64 हजार 697 तंट्यांचे गावपातळीवरच निराकरण करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख सात हजार 115 फक्त फौजदारी तंटे होते. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्याने सर्वाधिक तंटे या मोहिमेत मिटविले होते. यंदा अशा प्रकारचे तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा बाह्यसमित्यांनी मूल्यमापन केलेले अहवाल जुलैच्या अखेर सरकारकडे सादर केले जाणार आहेत. त्यातून 9 ऑगस्ट रोजी तंटामुक्त गावांची घोषणा केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

पारितोषिक रकमेतही वाढ
गावात तंटे होऊ नयेत, दाखल झालेल्या व नवीन तंट्याचे निराकरण करून ते कमी करण्याच्या राज्यव्यापी मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांना त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्याकरिता 200 गुण ठेवले जातात. या मूल्यांकनात 190 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना पारितोषिकांच्या रकमेतही 25 टक्‍क्‍यांची भरीव वाढ करून मिळते.

(sakaal,27 th june)

No comments: