Sunday, June 7, 2009

गरम पावभाजी टाकण्याचे "ते' कृत्य रागाच्या भरात

आरोपीला पश्‍चाताप


दादरच्या हॉटेल कामत येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर गरम पावभाजी टाकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नोकराला आज न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. दरम्यान, दुपारी ऐन गर्दीची वेळी मुलगी पाणी मागत असल्याने रागाच्या भरात आपल्याकडून हे कृत्य घडल्याचे आरोपी शेंटू नाथ याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दादर पश्‍चिमेला असलेल्या हॉटेल कामत येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या गंगा काळे या फुलविक्रेत्या मुलीच्या अंगावर हॉटेलमधील नोकर नाथ याने गरम पावभाजी टाकली. या प्रकरणी दादर पोलिसांनी त्याला अटक केली. आज सकाळी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका केली. या घटनेनंतर हॉटेल कामतमध्ये काम करणारा नोकर शेंटू नाथ याला चांगलाच पश्‍चात्ताप झाला आहे. हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी प्रचंड गर्दी असते. अशा वेळी येणाऱ्या ग्राहकांकडे लक्ष देत असताना अन्य कोणतीच कामे होत नाहीत. अशा वेळी गंगा आपल्याकडे पाणी मागण्यासाठी आली. वारंवार सांगितल्यानंतरही ती न गेल्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर गरम पावभाजी टाकण्याचे कृत्य आपल्याकडून घडले, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव बंगाळे यांनी दिली.

वडाळ्याच्या गणेशनगर येथे राहणारी गंगा आज तिच्या पायाला झालेल्या जखमेमुळे घरीच आराम करीत होती, अशी माहिती तिची चुलत बहीण संगीता काळे हिने दिली. दोन वर्षांपूर्वी तिचे वडील गोरखनाथ यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी तिची आई सोनी आणि तिने फुलविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यात गंगाची शाळा तिसरीतच सुटली, अशी माहितीही तिच्या चुलत बहिणीने दिली.


(sakaal,3rd june)

No comments: