Sunday, June 7, 2009

दाऊद टोळीच्या मर्चंटला बांगलादेशात अटक

कॅसेटकिंग गुलशनकुमार यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असताना न्यायालयाने "फरलॉ'वर सोडल्यानंतर फरारी झालेला दाऊद टोळीचा कुख्यात गुन्हेगार अब्दुल रौफ मर्चंट याला ढाक्‍याजवळ बांगलादेश पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला मुंबई पोलिसांनी मात्र रात्री उशिरापर्यंत दुजोरा दिला नाही.
आठवडाभरापूर्वी मुंबईतून फरारी झालेला अब्दुल रौफ मर्चंट बांगलादेशच्या पूर्वेला असलेल्या ब्राह्मणबरीया या परिसरातील घरात आश्रय घेत असल्याची माहिती गुप्तचर विभाग आणि बांगलादेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल रात्री उशिरा पोलिस आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकांनी त्याला अटक केली. या वेळी त्याला आश्रय देणाऱ्या कमालमियॉं यालाही अटक करण्यात आली आहे. 1997 मध्ये झालेल्या कॅसेटकिंग गुलशनकुमार यांच्या हत्या प्रकरणातील रौफ प्रमुख आरोपी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या रौफला नुकतेच फरलॉवर सोडण्यात आले होते. जन्मठेपेची शिक्षा उपभोगत असलेल्या कैद्याला दर दोन वर्षांनी चौदा दिवसांकरिता त्याच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी सोडले जाते. त्यानुसार रौफलाही सोडण्यात आले होते. मात्र, या काळात त्याला दररोज मुंब्रा पोलिसांकडे हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. एक आठवडाभर हजेरी लावल्यानंतर रौफ अचानक फरारी झाला. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. काल रात्री गुप्तचर विभागाला तो बांगलादेशात ब्राह्मणबरीया परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला कडक पोलिस बंदोबस्तात ढाका येथे नेण्यात आले. पोलिसांना त्याच्याकडे शेख अब्दुल रहमान या नावाचा बनावट पासपोर्टही मिळाल्याचे "पीटीआय'ने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे.


(sakaal,28 th may)

No comments: