Tuesday, June 16, 2009

कारागृह झाले गुंड टोळ्यांचे अड्डे!

गुन्हेगारात सुधारणा आणि पुनर्वसन यासाठी राज्यात ठिकठिकाणी असलेली कारागृह म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांचे किल्ले झाले आहेत. अंडरवर्ल्डमधील गुंड टोळ्यांमध्ये या कारागृहांची वाटणी झाली असून, त्यांच्या या अघोषित कब्जाने नामचिन गुंड या कारागृहातून आपल्या टोळ्या चालवत असल्याचे भितीदायक वास्तव समोर आले आहे.

कोकण परिक्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण या मध्यवर्ती कारागृहांसह तळोजा, भायखळा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग आणि सावंतवाडी या न्यायालयांत तब्बल सात हजार कैदी विविध गुन्ह्यांखाली बंदिवान आहेत. अंडरवर्ल्डमधील विविध टोळ्यांचे डॉन, शार्पशुटर आणि सराईत गुन्हेगारांचा त्यात समावेश आहे. प्रतीस्पर्धी टोळ्यांशी असलेल्या वैमनस्यातून दुसऱ्या टोळीचा गुंड कारागृहात एकटा सापडल्यास त्याला टोळीच्या "हंडी' त घेऊन सहकाऱ्यांच्या साथीने बेदम मारहाण करण्याचे तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या एका टोळीच्या सर्व गुंडांना एकाच कारागृहात ठेवण्याचा अलिखित नियम आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांची राज्यातील विविध कारागृहात पद्धतशीरपणे विभागणी झाली आहे. राज्यातील प्रमुख कारागृहांपैकी ठाणे आणि आर्थर रोड कारागृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा तर अमरावती, औरंगाबाद आणि भायखळा कारागृहांवर गवळी टोळीचा वरचष्मा आहे. कोल्हापूर, येरवडा, कल्याण आणि गेल्या काही महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहात छोटा राजन टोळीचे प्रस्थ वाढले आहे. पूर्वी पुणे मध्यवर्ती कारागृहातून अमर नाईक टोळी आपल्या गुन्हेगारी कारवाया चालवत होती. एखाद्या ठराविक टोळीचे गुंड एकाच कारागृहात असल्यामुळे प्रमुख टोळ्यांनी कारागृहाच्या परिसरातच घरे घेऊन आपली जनसंपर्क कार्यालये थाटल्याचे धक्कादायक चित्र आहे. याच घरांतून टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवायांटे प्लॅन ठरतात.
तुरुंगाबाहेरच्या गुन्हेगारी घडामोडींची माहिती होण्याकरता कारागृहातील गुंडांकडून बाहेरच्या जेवणाचे निमित्त केले जाते. जेवणाच्या डब्यांतून चिठ्ठ्या व निरोप कारागृहाबाहेरील साथीदारांना पाठवून त्याद्वारे खंडण्या तसेच खुनाच्या "सुपारी' देण्याचे प्रकारही सर्रास चालतात. मुंबईत डोंगरी येथून दाऊद टोळीच्या गुंडांसाठी तर भायखळ्याच्या दगडी चाळीतून टोळीचा म्होरक्‍या आमदार अरुण गवळीसह त्याच्या टोळीच्या कित्येक गुंडांना घरचे जेवण जाते. हाच प्रकार छोटा राजन टोळीच्या गुंडांबाबतही आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मुलाखतीद्वारे भेटता येते. कैद्यामार्फत त्यांची नावे आधीच कारागृह व्यवस्थापनाला कळविण्याचा शिरस्ता आहे. मात्र, कुटुंबीयांच्या नावावर अनेकदा या गुन्हेगाराचे साथीदारच "मुलाखतीच्या निमित्ताने' त्यांची भेट घेत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या उर्वरित भागात असलेल्या कारागृहातही हेच प्रकार बिनबोभाट सुरू आहेत.

गुंड टोळ्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तितक्‍या परिणामकारक नसल्याने या टोळ्यांचे चांगलेच फावले आहे. मुंबई, ठाणे, कल्याणसारख्या प्रमुख कारागृहात कैद्यांमार्फत मोबाईल फोनचा वापर होऊ नये याकरिता बसविलेले मोबाईल जॅमर गेल्या काही दिवसांपूर्वीच काढून टाकले गेले. कारागृहातील पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही या गुंड टोळ्यांकडून मिळणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना अमली पदार्थ, शस्त्र तसेच कारागृहाबाहेरच्या टोळीतील सदस्यांबरोबर बोलण्यासाठी मोबाईल फोन पुरवतात. भायखळा कारागृहात कैद्यांना अशा प्रकारे मदत करणाऱ्या तुरुंग अधिक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई नुकतीच झाली. या घटनेनंतरच गुंड टोळ्यांचे कारागृहांवर असलेले वर्चस्व प्रकर्षाने उघडकीस आले.

राज्यातील प्रमुख कारागृहांत क्षमतेच्या तीनपट अधिक कैदी ठेवल्याचे वास्तव असताना कारागृहातून सुरू असलेल्या अंडरवर्ल्डच्या कारवायांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारीही चिंता व्यक्त करत आहेत. कैद्यांना अमली पदार्थ, शस्त्र आणि मोबाईल फोनच्या पुरवठ्याच्या तुरुंगात घडलेल्या घटनांनंतर सर्व कारागृह अधीक्षकांकडून कैद्यांची तसेच त्यांना ठेवलेल्या बराकींची नियमितपणे झडती होत असल्याची माहिती दक्षिण विभागीय तुरुंग उपमहानिरीक्षक रजनीश सेठ यांनी "सकाळ' ला दिली. तुरुंगात एका टोळीचे गुंड एकत्र राहत असले तरी त्यांना मुद्दाम एकत्र आणले जाते असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कैद्यांच्या वाढत्या संख्येवर तोडगा काढण्याकरिता लवकरच ओरोस आणि पालघर येथे दोन अद्ययावत कारागृहे उभारण्यात येणार आहेत. दोन हजार कैद्यांची क्षमता असलेल्या तळोजा कारागृहात सध्या 700 कैदी आहेत. येत्या काळात इतर ठिकाणचे कैदी तेथे हलविण्यात येतील. केंद्र सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून तुरुंगांत अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे बसविली जाणार असल्याचेही सेठ यांनी सांगितले.

------------


मध्यवर्ती कारागृहांसह राज्यात एकूण 41 कारागृहे आहेत. त्यात प्रमुख कारागृहांच्या उपविभागांचाही समावेश आहेत. मात्र, त्यातील प्रमुख कारागृहांत शिक्षा झालेल्या व कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. तुलनेत कारागृहांचा विस्तार न झाल्यामुळे साठ जणांसाठी असलेल्या बराकीत दीडशे बंदी ठेवण्याची वेळ काही ठिकाणी प्रशासनावर आली आहे. पुण्यातील येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या प्रमुख कारागृहांत सध्या गर्दी झाली आहे. त्या शिवाय चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, अलीबाग, बीड, नांदेड, जळगाव, सातार, नगर आदी कारागृहांतही क्षमतेपेक्षा अधिक बंद्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सर्व कारागृहांत मिळून 21 हजार बंदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे 25 हजारहून अधिक बंदी आहेत. कच्च्या कैद्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. महिला कैद्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 983 महिला कैद्यांना कारागृहात ठेवता येऊ शकेल, अशी व्यवस्था असताना, प्रत्यक्षात तेथे दीड हजारपेक्षा जास्त महिला कैदी आहेत. कारागृहाच्या विस्तारीकरणासाठी तसेच नव्या कारागृहांसाठी प्रशासाने पाठविलेल्या प्रस्तावांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष झाल्यामुळे अशी वेळ उद्‌भवली आहे.


(sakaal, 16 th june)

No comments: