Sunday, June 7, 2009

जगजित सिंग यांच्या सावत्र मुलीची आत्महत्या

ख्यातनाम गझलगायक जगजितसिंग यांची सावत्र मुलगी मोनिका चौधरी (50) हिने तिच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. याचाच ताण येऊन त्यांनी आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध गझलगायिका चित्रा सिंग यांना पहिल्या पतीपासून झालेली ही मुलगी आहे. या घटनेची वांद्रे पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
वांद्य्राच्या पेरीक्रॉस रोड येथील इमारतीत ही घटना घडली. दोन मुलगे, आई चित्रा आणि सावत्र वडील जगजितसिंग यांच्यासोबत या इमारतीत राहणाऱ्या मोनिका चौधरी यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सध्या जगजितसिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. घरात आई चित्रा आणि मोठा मुलगा असे दोघेच जण असताना रात्री उशिरा मोनिका यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पंख्याला लोंबकळत असल्याचा आढळला. या घटनेची माहिती सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास वांद्रे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह भाभा रुग्णालयात तपासणीसाठी नेला. तेथे डॉक्‍टरांनी त्या मरण पावल्याचे जाहीर केले. यानंतर मोनिका चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कुपर रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मोनिका यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
करिअरच्या सुरुवातीची काही वर्षे मोनिका यांनी मॉडेलिंग केले होते. चित्रा सिंग आणि त्यांचे पहिले पती देबोप्रसाद दत्ता यांची मोनिका ही कन्या आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने त्या सध्या तणावग्रस्त आयुष्य जगत होत्या. आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण सांगता येत नसले तरी पतीपासून वेगळ्या होण्याच्या तणावातूनच त्यांनी ही आत्महत्या केल्याची शक्‍यता परिमंडळ -9 चे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी व्यक्त केली.


(sakaal,29th may)

No comments: