Wednesday, May 27, 2009

पवनराजे हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत

राकेश मारिया ः पाच जणांचा शोध सुरू

तीन वर्षांपूर्वी नवी मुंबईत कळंबोली येथे कॉंग्रेसनेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. पवनराजे यांच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात आणखी पाच आरोपींचा शोध घेण्यात येत असून हत्येमागे असलेल्यांची नावे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला कळविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

कळंबोली स्टील मार्केटजवळ 3 जून 2006 रोजी कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी या दोघांची अनोळखी मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर मारेकऱ्यांनी शस्त्र तेथेच टाकून हिरव्या रंगाच्या टाटा इंडिका गाडीतून पळ काढला होता. या हत्येप्रकरणी सुरवातीला स्थानिक पोलिसांमार्फत तपास सुरू होता. या हत्येचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप करीत पवनराजे निंबाळकर यांच्या नातेवाइकांनी हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास ऑक्‍टोबर -2008 मध्ये सीबीआयकडे सोपविला होता. गुन्हे शाखेच्या युनिट -5 च्या पोलिसांना 25 फेब्रुवारी रोजी शाहूनगर येथे दरोडा घालणाऱ्या टोळ्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी एक जण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून पारसमल ताराचंद भडाला ऊर्फ पारस जैन (47, रा. डोंबिवली) याला अटक केली. या वेळी त्याच्याकडे दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि 12 जिवंत काडतुसे मिळाली होती. त्याच्या चौकशीत त्याने लोकमान्य टिळक मार्ग व भायखळा येथे दरोडे घालणाऱ्या टोळीला शस्त्र पुरविल्याची माहिती मिळाली. पोलिस कोठडीत तब्बल दोन महिने झालेल्या चौकशीनंतर जैन याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणातील सहभागाची कबुली दिली. या वेळी त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीस लाख रुपयांच्या सुपारीसाठी पवनराजे यांची हत्या केल्याचे सांगितले. त्याच्याच माहितीवरून पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे राहणारा दिनेश राममणी तिवारी (37) या कुख्यात गुंडाला अटक केली. पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोघा मारेकऱ्यांत दिनेश तिवारीचाही समावेश होता. पवनराजे यांची हत्या कर
णाऱ्या तिवारीवर यापूर्वी उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते राम पाठक यांच्या मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवनराजे निंबाळकर हे त्यांच्या एका जमिनीचा व्यवहार पारसमल जैन याच्यासोबत करणार होते. याचसंबंधी चर्चा करण्याच्या नावाखाली जैन याने पवनराजे निंबाळकरांना नवी मुंबईत बोलावले होते. कळंबोली स्टील मार्केटजवळ निंबाळकर यांची गाडी येताच जैन याच्यासोबत असलेला दिनेश तिवारी आणि अन्य एका मारेकऱ्यांनी पवनराजे आणि त्यांच्या चालकाला गोळ्या झाडून ठार मारले होते. पवनराजे यांच्या हत्येचा कट मुंब्रा येथील विश्‍वास रम्मी क्‍लबमध्ये सात जणांनी आखला होता. या हल्ल्यापूर्वी पवनराजे यांच्यावर आरोपींनी दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, असेही मारिया यांनी या वेळी सांगितले. या हत्येसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मारेकऱ्यांचा वापर करण्यात आला. हत्येसाठी लागणाऱ्या शस्त्रखरेदीसाठी सुरवातीला पाच लाख रुपये; तर काम झाल्यानंतर उरलेले पंचवीस लाख रुपये आरोपींना देण्यात आले होते. या हत्येसंबंधी आणखी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला ही माहिती कळविण्यात आल्याचेही मारिया म्हणाले. दरम्यान, गुन्हे शाखेने अटक केलेल्या या दोघा आरोपींना सीबीआयच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे.


(sakal, 26 th may)

No comments: