Friday, January 30, 2009

प्रजासत्ताक दिनासाठी कडेकोट सुरक्षा

जयंत पाटील ः एनएसजीच्या मुंबईतील केंद्रासाठी तीन वर्षे लागणार

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर काही असामाजिक तत्त्वांकडून प्रमुख शहरांत घातपात घडविण्याची शक्‍यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याने राज्यात ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे मुंबईतील केंद्र सुरू होण्यासाठी आणखी अडीच ते तीन वर्षांचा काळ लागण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

पोलिस महासंचालक कार्यालयात राष्ट्रपती पदकांच्या वितरणप्रसंगी गृहमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस बाकी असताना दिल्ली येथे दोघा दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याच्या घटनेनंतर गुप्तचर खात्याने दहशतवादी संघटनांकडून घातपात घडविण्याची शक्‍यता वर्तविली आहे. तशा प्रकारच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांत कमालीची सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
अतिरेकी हल्ल्याच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत एनएसजीचे एक पथक ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पथक फक्त महाराष्ट्राकरिता मर्यादित नसून सबंध पश्‍चिम विभागासाठी ठेवण्यात येणार आहे. या पथकाच्या तळाकरिता कल्याण येथील जागा देण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत या पथकाचा तळ निर्माण करण्यासाठी अडीच-तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे; मात्र राज्य सरकारचे "फोर्स-1' कमांडो पथक येत्या अडीच महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याचे पाटील या वेळी म्हणाले.

मुंबई हल्ल्यातील शहिदांना शौर्यचक्र देण्यासंबंधी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. पुरस्कार देण्यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्राचा आहे. मर्यादित संख्येमुळे यंदा मोजक्‍यांनाच "अशोकचक्र' देण्यात आले असले, तरी उर्वरितांकरिता पुढच्या वर्षी प्रयत्न केले जातील, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

चोख सुरक्षाव्यवस्था ः रॉय
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली असून ऐतिहासिक स्थळे, मोठमोठी हॉटेल्स, विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंसह संवेदनशील ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणीसुद्धा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांनी दिली.

(sakal,25 jan)

No comments: