Friday, January 16, 2009

हुतात्मा पोलिसांचे शौर्य सदैव स्मरणात राहील!

जयंत पाटील ः वारसांना सारस्वत बॅंकेत नोकरी


मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांच्या "एके-47'चा सामना करून स्वतःच्या प्राणाचे बलिदान करीत मोहम्मद अजमल कसाबला पकडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे शौर्य देश सदैव स्मरणात ठेवेल. ओंबळेंमुळेच अतिरेकी कसाब जिवंत हाती लागला आणि देशाला या कटाबाबत पाकिस्तानकडे बोट दाखविता आले. मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या शौर्याची तुलना कशाशीच करता येणार नाही, अशा शब्दांत गृहमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य पोलिस मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पाटील बोलत होते.
26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात स्वतःचा जीव गमावून देशवासीयांना सुरक्षित ठेवणाऱ्या पाच पोलिसांच्या वारसांना सारस्वत बॅंकेने नोकरीत सामावून घेतले. हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला देण्यात आलेल्या नोकरीच्या नियुक्तीपत्रांचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष माजी खासदार उल्हास ठाकूर यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी आपल्या मनोगतात बोलताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी अपूर्ण साधनांसोबत अतिरेक्‍यांशी लढा दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. प्रत्येक हुतात्म्याचे धाडस, शौर्य अनन्यसाधारण आहे. पोलिस शिपाई अंबादास पवार यांनी तर ड्युटीवर नसतानाही केवळ देशावर अतिरेकी हल्ला झाल्याचे समजताच छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांची रायफल घेऊन अतिरेक्‍यांशी मुकाबला केल्याची आठवणही त्यांनी यानिमित्त सांगितली. सारस्वत बॅंकेने हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी देऊन दिलेल्या स्थैर्याबद्दल पाटील यांनी बॅंकेचे आभार मानले.
हुतात्मा सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची विवाहित मुलगी पवित्रा चिकणे, बाळासाहेब भोसले यांचा मुलगा सचिन, पोलिस शिपाई अरुण चित्ते यांची पत्नी मनीषा व पोलिस शिपाई अंबादास पवार यांची पत्नी कल्पना या चौघांना कार्यालयीन सहायक म्हणून; तर रेल्वे पोलिस शिपाई मुरलीधर चौधरी यांची मुलगी प्रियांका हिला लिपीक म्हणून नोकरीत सामावून घेण्यात आले.


चौकट
---------

आरोपांची चौकशी सुरू
मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची पत्नी विनिता यांनी पोलिस यंत्रणेवर केलेल्या आरोपांची चौकशी निवृत्त सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सुरू आहे. दोन महिन्यांत हा अहवाल येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गुप्तचर खात्यात सुधारणा करण्यासाठी 85 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांना गोळीबाराच्या सरावासाठी फायरिंग रेंज कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांना वर्षभर पुरेल एवढा शस्त्रसाठा देण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या फायरिंग रेंजवर पोलिसांचा सरावच सुरू नसल्याचे ते म्हणाले.


(sakal,14 jan)

No comments: