Tuesday, January 13, 2009

मुंबई हल्ल्याच्या खटल्यासाठी तहिलियानी यांची निवड

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासाठी ज्येष्ठ न्यायाधीश एम. एल. तहिलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी ही माहिती "सकाळ'ला दिली. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी पोलिसांच्या हाती लागला आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केलेला फहीम अन्सारी व सबाउद्दीन अहमद यांचाही मुंबई हल्ल्यातील सहभाग स्पष्ट झाला आहे. या प्रकरणी 24 जानेवारीपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर "लष्कर-ए-तैयबा'च्या या दहशतवाद्यांवर विशेष न्यायालयात खटला चालणार आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने आज विशेष न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. एल. तहिलियानी यांची निवड केल्याची माहिती पोलिस आयुक्त गफूर यांनी दिली. तहिलियानी सध्या मुंबई उच्च न्यायालयात रजिस्ट्रार (इन्स्पेक्‍शन) पदावर कार्यरत आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. यापूर्वी ते मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.

( sakal,12 jan)

No comments: