Friday, January 23, 2009

"नवाकाळ'च्या कार्यालयावर हल्ला

काचांची तोडफोड ः राणेसमर्थकांवर संशय

दैनिक "नवाकाळ'च्या गिरगाव येथील कार्यालयावर अनोळखी तरुणांनी दगडफेक करून कार्यालयाच्या काचांची तोडफोड केल्याची घटना आज दुपारी घडली. हा हल्ला नवाकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या "शुभ बोल रे नाऱ्या' या अग्रलेखामुळे संतापलेल्या माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी केल्याचा संशय आहे.
या हल्ल्यामागे असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. के. चिखले यांनी दिली. दरम्यान, हा हल्ला नारायण राणे यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप नवाकाळचे संपादक निळकंठ खाडिलकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

गिरगावच्या शेणवीवाडी येथे दैनिक नवाकाळचे कार्यालय आहे. आज दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाखाली दहा ते बारा तरुणांचा घोळका जमा झाला. त्यातील एक जण कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जाहिरात विभागात गेला. यावेळी तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना "राणेसाहेबांविरुद्ध अग्रलेख लिहिता काय? अशा शब्दात धमकावत तेथील काचा फोडून तो पळून गेला. त्यानंतर खाली असलेल्या काही तरुणांनी सोबत आणलेले पेव्हर ब्लॉक आणि दगड या कार्यालयावर भिरकावले. त्यामुळे कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नवाकाळच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने व्ही. पी. रोड पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोचेपर्यंत कार्यालयावर दगडफेक करणारे तरुण पळून गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी नवाकाळच्या कार्यालयावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नवाकाळच्या कार्यालयाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. हा हल्ला राणेसमर्थकांनी केल्याचा संशय असला, तरी या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याने कोणालाच अटक केली नसल्याचेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिखले यांनी सांगितले.
---------------

फसवणूकप्रकरणी भरत शहाला अटक

सिल्व्हासा न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून मलबार हिल पोलिसांनी प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आज दुपारी अटक केली. अटकेनंतर शहा याला गिरगाव न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मलबार हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय एच. शेख यांनी दिली.
सिल्व्हासा येथे एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी तेथील न्यायालयाने भरत शहाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मलबार हिल पोलिसांना हे वॉरंट आज मिळाले. त्यानुसार पोलिसांनी आज शहा याला अटक केली. अटकेनंतर शहा याला गिरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रकरण सिल्व्हासा येथील असल्याने या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला

(sakal,22jan)

No comments: