Tuesday, January 13, 2009

डान्सबारमध्ये उधळले 65 लाख!

सांताक्रूझमधील घटना : शिक्षणसम्राटाच्या सुशिक्षित सुपुत्राचा पराक्रम

डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असला, तरी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पोलिसांच्या डोळ्यांदेखत मुंबई शहरातील अनेक डान्सबारमध्ये बारबालांचा मुक्त संचार सुरू आहे. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या "स्टारनाईट' डान्सबारवर टाकलेल्या छाप्यात नऊ बारबालांना अटक करण्यात आली. पुण्यातील एका शिक्षण संस्था चालकाचा मुलगा आणि एका प्रथितयश विकसकाच्या भावाने या बारबालांवर एका रात्रीत 65 लाख रुपये उधळल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या छाप्यानंतर या दोघांनाही अतिशय पद्धतशीरपणे बारमधून बाहेर निघण्याचा रस्ता दाखविण्यात आला, असे बोलले जाते. बारमध्ये असलेल्या ग्राहकांच्या "चाळ्यां'शी आपल्याला काहीच देणेघेणे नसते, मात्र तेथील बारबालांवर आपण कारवाई केली आहे, असे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
सांताक्रूझच्या "स्टारनाईट' बारमध्ये समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी 26 डिसेंबरला रात्री उशिरा छापा घातला होता. या वेळी ग्राहकांसमोर अश्‍लील हावभाव करणाऱ्या नऊ बारबालांना पोलिसांनी अटक केली. या वेळी बारबालांवर उधळलेले 11 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले होते. प्रत्यक्षात या बारमध्ये त्या वेळी पुण्यातील एका ख्यातनाम शिक्षण संस्था चालकाचा मुलगा आणि बड्या विकसकाचा भाऊ होता. या विकसकाची पुण्यातील सरकारी बांधकाम प्रकल्पांत कामे सुरू आहेत. या दोघांनी तेथे असलेल्या बारबालांवर तब्बल 65 लाख रुपये उडविले. बारमध्येच असलेल्या एका ऍण्टी चेंबरमध्ये या बड्या हस्ती बारबालांसोबत बराच वेळ होत्या. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी या बारमध्ये छापा घातल्यानंतर मात्र या दोघांना तेथून अतिशय सावधपणे बाहेर काढण्यात आले. आता या बारबालांवर उडविण्यासाठी या दोघांनी एवढी रोख रक्कम कुठून आणली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बारबालांच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारवर बंदी घातली. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत डान्सबारमध्ये थांबून आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्‍लील हावभाव करणाऱ्या अथवा त्यांच्याशी लगट करणाऱ्या बारबालांचा धंदा बंद झाला होता. काही बारमध्ये तर वेश्‍याव्यवसायच चालविण्यात येत असल्याने बारबंदीच्या निर्णयाचे स्वागतच झाले होते. डान्सबार बंदीनंतर "लेडीज सर्व्हिस बार'च्या नावाखाली महिलांना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत थांबण्याची परवानगी देण्यात आल्याने या बारना पुन्हा नवी झळाळी आली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच परवानगी असताना हे बार अनेकदा स्थानिक पोलिसांच्या वरदहस्ताने पहाटे उशिरापर्यंत चालतात. समाजसेवा शाखेचे पोलिस मात्र अनेकदा या बारवर छापे घालून तेथील बारबालांवर कारवाई करतात. आर. आर. पाटील यांनी 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर शहरातील डान्सबारचालकांचे चांगलेच फावले आहे. या बारचालकांनी त्यांच्या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारबालांना ठेवायला सुरुवात केली आहे. याकडे बऱ्याचदा पोलिसही डोळेझाक करीत असल्याने समाजसेवा शाखेच्या पोलिसांचे काम वाढल्याचे सांगितले जाते. सांताक्रूझ येथील बारवर टाकलेल्या छाप्याबाबत समाजसेवा शाखेच्या पोलिसांकडे विचारणा केली असता बारमध्ये असलेल्या बारबालांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर उधळण्यासाठी आणलेली रक्कमही जप्त केल्याचे सांगितले. या प्रकरणी मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचे या विभागाचे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी कबूल केले.

(sakal,6 jan)

No comments: