Tuesday, January 20, 2009

हिंदूराष्ट्राच्या निर्मितीसाठीच मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट

के. पी. रघुवंशी ः आरोपींचा नेपाळमधील माओवाद्यांशी संपर्क


भारतीय संविधानाप्रमाणे चालायचे नाही. "अभिनव भारत'च्या छत्राखाली एकत्र येऊन स्वतंत्र हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, त्यासाठी वेळ पडल्यास इस्राईलचीही मदत घ्यायची, असे मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींचे मनसुबे होते, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील आरोपींचा इस्राईलशी कोणताही थेट संबंध उघडकीस आला नसला, तरी काही आरोपी नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहितीही तपासात उघडकीस आल्याचे रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.
मालेगाव येथील भिक्‍खू चौकात गेल्यावर्षी 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने आज 11 आरोपींविरुद्ध मोक्‍का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुवंशी यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर प्रकाशझोत टाकला. भारतात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत "सिमी'सारख्या मुस्लिम संघटनांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने "अभिनव भारत'ची स्थापना केली. याच संघटनेच्या नावाखाली एकत्र आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कथित धर्मगुरू दयानंद पांडे आणि त्यांच्या साथीदारांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचला. जास्तीत जास्त मुस्लिमांचे बळी जावेत यासाठी रमझानच्या महिन्यात मालेगावमधील मशिदीचा परिसर आरोपींनी निवडला. याशिवाय 2006 मध्ये मालेगावमध्येच झालेल्या स्फोटात "सिमी' संघटनेचा सहभाग स्पष्ट झाल्यामुळे 29 सप्टेंबरच्या स्फोटाबाबत तपासयंत्रणांना संशय येणार नाही, असेही आरोपींना वाटले. यानंतरच त्यांनी हा कट आखल्याचे रघुवंशी म्हणाले.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींनी अभिनव भारत संघटनेच्या नावाने काही देणगीदारांकडून पैसे गोळा केले. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने काही देणगीदारांची चौकशी केली असून, त्यांना या संघटनेच्या उद्देशांबाबत माहिती नव्हती, असेही उघडकीस आले आहे. या प्रकरणात रामजी कलासांगरा, संदीप डांगे आणि प्रवीण मुतालिक हे तिघे आरोपी फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले.

(sakal,21 jan)

No comments: