Friday, January 2, 2009

पाकिस्तानातील डझनभर अतिरेकी मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची योजना आखणारे पाकिस्तानातील एक डझनहून अधिक अतिरेकी मुंबई गुन्हे शाखेच्या हिटलिस्टवर आहेत. यात अतिरेक्‍यांना प्रशिक्षण देण्यापासून प्रत्यक्ष कट आखणारे तसेच त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत या अतिरेक्‍यांची तसेच त्यांना मदत करणाऱ्यांची नावे पुढे आल्याचे हा अधिकारी म्हणाला.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताज, नरिमन हाऊस व हॉटेल ट्रायडंट येथे घातपात घडविणाऱ्या अतिरेक्‍यांचे पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या काही कमांडरसोबत संभाषण सुरू होते. हे संभाषण भारतातून परदेशात झाले असल्याने त्यासंबंधीचे ठोस पुरावे हाती येण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या संभाषणाबाबत भारतीय कंपन्यांकडून आवश्‍यक ती माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र पाकिस्तानकडून यासंबंधी माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. या प्रकरणातील अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणारे त्यांचे ट्रेनर, त्यांना अर्थपुरवठा करणारे, कट रचणारे तसेच हल्ल्याच्या वेळी प्रत्यक्ष संवाद साधणाऱ्यांची नावे पोलिसांना अतिरेकी कसाबच्या चौकशीतून मिळाली आहेत. हे सगळे पाकिस्तानमध्ये राहणारे असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. मुंबई हल्ला प्रकरणाचे आरोपपत्र या महिन्यात न्यायालयात दाखल होईल. अतिरेकी कसाब याचे वकीलपत्र घेण्यासाठी मुंबईतील ऍडव्होकेट लाम यांच्याव्यतिरिक्त बंगाल येथील तिघा वकिलांची फर्मही पुढे आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आरोपी फहीम अन्सारी व साबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत हल्ल्यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळाली असून आणखी एक संशयित आरोपी इमरान शहजाद याची कस्टडी 3 जानेवारीला घेण्यात येणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. अतिरेक्‍यांनी पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून मुंबईकडे येण्यासाठी वापरलेल्या कुबेर बोटीचा मालक विनोद मसाणी याची पोरबंदर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अद्याप चौकशी सुरू आहे.


(sakaal,1stjanuary 2009)

No comments: