Tuesday, January 13, 2009

कसाबच्या कोठडीत नेमक्‍या अधिकाऱ्यांनाच प्रवेश

14 दिवसांची कोठडी : पोलिसांना मोबाईल नेण्यास बंदी

मुंबई हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कोठडीत फक्त गुन्हे शाखेच्या ठरावीक पोलिस आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, यामागे कसाबचे छायाचित्र कोणालाही काढता येऊ नये, असा हेतू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
सध्या गुन्हे शाखेच्या युनीट-3 च्या पोलिस कोठडीत असलेल्या कसाबला पोलिस आयुक्तालयातच असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 12 गुन्हे दाखल असलेल्या कसाबला आतापर्यंत तीन गुन्ह्यांत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या स्कोडा गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कोठडी संपताच त्याला अन्य गुन्ह्यांत अटक करून नव्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्‍यता आहे.
कसाबला ठेवलेल्या कोठडीत पहिल्या दिवसापासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कसाब असलेल्या कोठडीत यापूर्वी नीरज ग्रोवर हत्याप्रकरणातील आरोपी दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिला ठेवण्यात आले होते. कोठडीत असलेल्या मारिया सुसायराजचे छायाचित्र त्या वेळी काहींनी काढले. मारियाचे हे छायाचित्र आठ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कसाब असलेल्या कोठडीत चौकशीसाठी जाणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळातच मर्यादित लोकांना प्रवेश असलेल्या या कोठडीत जाणाऱ्या प्रत्येक पोलिस व अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याची नोंदणी करण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

No comments: