Tuesday, January 13, 2009

जुहूच्या रेव्ह पार्टीतील सर्वांकडूनच "ड्रग्ज'चे सेवन

अंतिम अहवाल : झिंगणारे 17 ते 25 वयोगटातील

अमली पदार्थ विरोधी पथकाने जुहूच्या "बॉम्बे-72 डिग्री' रेस्टॉरंटमधील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या 231 बड्या घरांतील तरुण-तरुणींच्या रक्त व लघवीच्या नमुन्यांचा अंतिम अहवाल प्रसिद्ध केला आहे. रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या सर्वच तरुणींनी एमडीएमए, चरस व गांजा यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसही सुन्न झाले आहेत. अनेक निष्पापांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता व्यक्त करीत रेव्ह पार्ट्यांचे चित्रीकरण करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय विधानसभा अधिवेशनात नुकताच झाला असताना जुहूच्या रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या 92 टक्के तरुण-तरुणींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये 17 ते 25 वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश आहे. या सर्व दोषींना तांत्रिकदृष्ट्या अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने 5 ऑक्‍टोबरला जुहूच्या बॉम्बे-72 डिग्री रेस्टॉरंटवर छापा टाकून, तेथे सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली होती. पोलिसांनी या पार्टीत सहभागी झालेल्या 231 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. या पार्टीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आठ जणांसह एकूण पंधरा दोषींना पोलिसांनी अटक केली. या वेळी पोलिसांनी एक्‍सटीसी, एलएसडी, चरस अशा महागड्या अमली पदार्थांचा साडेनऊ लाख रुपयांचा साठाही हस्तगत केला होता. उद्योजक, व्यावसायिक, राजकारणी व चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या "लाडक्‍यांचा' या पार्टीत सहभाग होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींच्या रक्त व लघवीचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल पोलिसांना तीन टप्प्यांत प्राप्त झाला. त्यातील अंतिम अहवाल अमली पदार्थ विरोधी पथकाला आज मिळाला. या अहवालानुसार पार्टीत सहभागी झालेल्या सर्व 36 तरुणी त्या वेळी अमली पदार्थांच्या नशेने झिंगल्या होत्या; तर 195 पैकी 176 तरुणांनी मादक पदार्थ घेतल्याचेही स्पष्ट झाले. रेव्ह पार्टी ठरविणाऱ्यांत एका महिलेचाही समावेश होता. तिची चाचणीदेखील पॉझिटीव्ह आली आहे. या महिलेने एमडीएमए या अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघडकीस आले आहे

( sakal, 4 jan)

No comments: