Tuesday, January 13, 2009

इंडियन मुजाहिदीनला मदत करणाऱ्या डॉक्‍टरला अटक

देशभरातील बॉम्बस्फोट ः आरोपींची संख्या 21; कोठडीत रवानगी

देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील एका डॉक्‍टरला हैदराबाद येथून अटक केली. त्याला मोक्का न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. डॉक्‍टरच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या एकवीस झाली आहे.

डॉ. अन्वरअली बागवान (26) असे या आरोपी डॉक्‍टरचे नाव आहे. नगरच्या राहुरी येथील देवळाली-प्रवरा गावचा असलेल्या डॉ. अन्वर अलीने पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. जयपूर, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, दिल्लीसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील अशोका म्यूज व कमलदीप पार्क येथे घर भाड्याने घेऊन देण्यास त्याने मदत केली. अशोका म्यूजमधील घरासाठी तो 31 हजार रुपये डिपॉझिट; तर नऊ हजार रुपये मासिक भाडे देत होता; तर कमलादीप पार्कमधील घरासाठी तो मासिक दोन हजार 800 रुपये भाडे देत होता. अशोका म्यूजमधील घरातच इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांनी देशभरातील आपला नियंत्रण कक्ष सुरू केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याच इमारतीतून इंडियन मुजाहिदीनची मीडिया विंग सांभाळणारा संगणकतज्ज्ञ मोहम्मद मन्सूर असगर पिरबॉय आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक केली. पुण्यातील बडे बिल्डर आणि सराफांचे अपहरण करून त्यांना गुंगीचे इंजेक्‍शन देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी डॉक्‍टर अन्वरअलीने या अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अकबर आणि आतिक शेख यांना इंजेक्‍शन देण्याचे प्रशिक्षण दिले होते. पुण्यातील एका अरबी क्‍लासमध्ये अतिरेकी आसिफ बद्रुद्दीन शेख याची ओळख डॉक्‍टर अन्वरअली सोबत झाली. यानंतर त्याने अन्वरअलीला इंडियन मुजाहिदीन संघटनेत सामील करून घेतले. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक असलेल्या रियाज भटकळची त्याने भेट घेतली होती.
देशभरात 2005 पासून झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना उत्तर प्रदेशच्या आझमगड, पुणे व कर्नाटक येथून अटक झाल्यानंतर तो हैदराबाद येथे निघून गेला होता. तेथे तो प्रॅक्‍टिस करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला मुंबईत चौकशीसाठी बोलावले. यानंतर त्याला अटक करून आज मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.


(sakal,6 jan)

No comments: