मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहापैकी सहा अतिरेक्यांना पाहणारी साक्षीदार महिला अनिता उद्दैया हिने आता आपण अमेरिकेला गेलो होतो, असा दावा प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. यापूर्वी तिने आपण साताऱ्याला गेल्याचे कफ परेड पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले होते. या प्रकरणावर आपल्याला काहीच बोलायचे नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सागरी मार्गाने कुलाब्याच्या बधवार पार्क येथे उतरलेल्या सहा अतिरेक्यांना अनिता उद्दैय्या हिने सर्वांत प्रथम पाहिले होते. हल्ल्यानंतर ती या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार ठरली होती. यानंतर 11 जानेवारी रोजी सकाळी ती अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिची मुलगी सीमा हिने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. अनिताचा शोध सुरू असतानाच काल सकाळी ती आपल्या घरी परतली. या वेळी तिने पोलिसांना आपण सातारा येथे गेल्याचे सांगितले होते. मात्र आज तिने आपल्याला काही जणांनी अमेरिकेला नेले होते, असा दावा केला. त्या दिवशी जे काही पाहिले तेच तेथील अधिकाऱ्यांना सांगितल्याचे अनिताने काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले. आपल्याला अंधेरीच्या दिशेने नेण्यात आल्यानंतर विमानात बसविण्यात आले. दहा तासांनंतर आपण अमेरिकेत पोचल्याचे तिचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर अनिता नक्की कुठे गेली होती, याबाबत पोलिसांत अद्याप संभ्रम आहे. तिने कफ परेड पोलिसांना दिलेल्या जबाबात सातारा येथे नातेवाइकांकडे गेल्याचे म्हटल्याची माहिती मारिया यांनी दिली. याबाबत आपल्याला आणखी काही बोलायचे नसल्याचेही ते म्हणाले.
(sakal,15jan)
-----------------------
बेपत्ता महिला साक्षीदार परतली
मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांना ओळखणारी महिला साक्षीदार अनिता उदैया (वय 47) आज सकाळी तिच्या घरी परतली. रविवारी सकाळपासून ती बेपत्ता झाली होती. तिच्या घरी परतण्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बधवार पार्क येथे उतरलेल्या अतिरेक्यांना पहिल्यांदा पाहणारी अनिता अचानक बेपत्ता झाली होती. यामुळे अनेक तर्क लढविले जात होते. याप्रकरणी तिची मुलगी सीमा हिने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली; मात्र ती पोलिसांना सापडली नव्हती. प्रसिद्धिमाध्यमांत ती बेपत्ता असल्याचे वृत्त पसरताच आज सकाळी ती तिच्या घरी परतली. कोणालाही न सांगता ती रहमतपुरा येथे आपल्या नातेवाइकांकडे गेली होती, असे सांगण्यात येते.
(sakal,14 jan)
-------------------
अतिरेक्यांना ओळखणारी साक्षीदार महिला बेपत्ता
मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी कुलाबा येथील बधवार पार्कवर उतरलेल्या अतिरेक्यांना ओळखणारी साक्षीदार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी या महिलेच्या मुलीने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील दहापैकी सहा अतिरेक्यांना ओळखणारी अनिता राजेंद्र उदैया (वय 47) ही महिला रविवार सकाळी बेपत्ता झाली. या प्रकरणी तिची मुलगी सीमा हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हल्ल्यानंतर पोलिस आणि एनएसजी कमांडोंच्या कारवाईत मरण पावलेल्या सहा अतिरेक्यांना तिने ओळखले होते. रविवारी सकाळी अचानक ही महिला बेपत्ता झाली. हल्ल्यातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या या महिलेचा शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
(sakal,13 jan)
No comments:
Post a Comment