Tuesday, January 20, 2009

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आज आरोपपत्र

हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग उघडकीस आल्याने वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट मालिकेचे आरोपपत्र उद्या (ता. 20) दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलिस महासंचालक कार्यालयात आजपासून दोन दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरवात झाली. या वेळी पत्रकारांशी बोलताना गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास अंतिम टप्प्यात असून त्याचे आरोपपत्र मंगळवारी मोक्का न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री पाटील म्हणाले. मालेगाव स्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, कथित हिंदुत्ववादी धर्मगुरू दयानंद पांडे याच्यासह अकरा जणांना अटक केली. सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अतिरेकी हल्ल्यातील मृत्यूनंतर या पथकाची धुरा खांद्यावर घेणारे रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास पूर्णत्वास नेला. या प्रकरणाचे आरोपपत्र विशेष मोक्का न्यायालयासमोर दाखल होणार आहे.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. त्याला ऑर्थर रोड तुरुंगात अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याच्यावर ऑर्थर रोड तुरुंगात विशेष न्यायालय स्थापन करून खटला चालविण्याबाबत उच्च न्यायालयात विनंती करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
या वेळी झालेल्या बैठकीत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री पाटील यांनी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्याच्या नक्षलवादी भागात हेलिकॉप्टर देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील डान्सबार आणि मटका व्यवसाय पुन्हा सुरू होणार नाही, याकडे पोलिसांनी कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------
चौकट
जिल्हा अधीक्षक कार्यालये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जोडणार ः मुख्यमंत्री
राज्यातील सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालये व्हिडीओ कॉन्फरसिंगने जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिली. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर स्थापण्यात आलेल्या "फोर्स वन' पथकाचे काम येत्या 60 दिवसांत सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

(sakal,20 jan)

No comments: