Tuesday, January 13, 2009

बारबालांवर 65 लाख नव्हे; पावणेदोन कोटी उधळले..!

पोलिसांची माहिती ः गुन्हा दाखल झाल्यावर नावे उघड करणार

सांताक्रूझ येथील "स्टारनाईट' डान्स बारमध्ये 65 लाख रुपये उधळणाऱ्या दोघांपैकी एक जण प्रथितयश कंत्राटदाराचा भाऊ; तर दुसरा मुंबईतल्या एका ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या चालकाचा जवळचा नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे, तर या दोघांनी डान्स बारमध्ये 65 लाख नव्हे, तब्बल एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज येथे दिली.

यापूर्वी या दोघांनी 65 लाख रुपये उधळल्याचे आणि त्यापैकी एक जण पुण्यातील शिक्षणसम्राटाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले होते; मात्र या दोघांची नावे पोलिसांकडे असली, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच ती प्रसिद्धिमाध्यमांना सांगितली जातील, असेही मारिया यांनी आज स्पष्ट केले.

पोलिसांच्या गुन्हे शाखेचाच एक भाग असलेल्या समाजसेवा शाखेने सांताक्रूझ येथील "स्टारनाईट' डान्स बारवर 26 डिसेंबर रोजी छापा घातला. छाप्याच्या दोन ते तीन दिवस आधी या बारमध्ये मौजमजेसाठी आलेल्या "त्या' दोघांनी 65 लाख रुपये उधळल्याचे वृत्त आज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले; मात्र पोलिस तपासानंतर त्यांनी 65 लाख नव्हे, तर तब्बल एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याची माहिती उघड झाली.
परदेशी बनावटीच्या गाडीतून आलेल्या त्या दोघा धनाढ्यांनी येतानाच बॅगांमधून ही रक्‍कम आणली होती. बारमध्ये सोबत घेतलेली रक्कम बारबालांवर उधळून संपल्यानंतर बाहेर असलेल्या आपल्या अंगरक्षकांना ते गाडीत ठेवलेली रक्कम वेळोवेळी घेऊन येण्यास सांगत होते, अशीही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. चार बारबालांवर ही पैशांची खैरात करण्यात आली असली, तरी पोलिसांच्या हाती मात्र त्यापैकी केवळ 11 लाख रुपयांची रोकडच लागली आहे.

यासंदर्भात गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बारमध्ये दोघा बड्या धनिकांनी एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याची माहिती दिली; मात्र याप्रकरणी कोणाचीच तक्रार नसल्याने आपल्याला कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्या तक्रारीशिवाय आयकर विभागालाही या प्रकाराची माहिती देता येत नाही; मात्र गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्या खबऱ्यांमार्फत या संपूर्ण घटनेची माहिती घेत असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, छापा घातल्यानंतर पोलिसांनी हा बार बंद केल्याची माहिती समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव जोशी यांनी दिली.

(sakal,7 jan)

No comments: