Tuesday, January 13, 2009

कसाबची पाकिस्तानकडे पुन्हा मदतीची मागणी

अतिरेकी हल्ला ः खटल्याची सुनावणी इम कॅमेरा


मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडे कायदेविषयक मदत मागितली. आपल्याला कायदेविषयक मदतीकरिता पाकिस्तानी वकील मिळावा, अशी मागणी त्याने अतिरिक्त न्याय दंडाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याची सुनावणी "इन कॅमेरा' करण्याचे सूतोवाचही या अधिकाऱ्याने या वेळी केले.

कसाबचे वकीलपत्र घेण्याची तयारी ऍडव्होकेट लाम यांनी दर्शविली असली, तरी पाकिस्तान सरकारकडून मिळणाऱ्या कायदेशीर मदतीला त्याचे प्रथम प्राधान्य असल्याचे हा अधिकारी म्हणाला. कसाबवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांत त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. यानंतर आज त्याला कामा रुग्णालयातील नव्या गुन्ह्यात अटक झाली.

मुंबई हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत फहीम अन्सारी व सबाउद्दीन अहमद यांची चौकशी झाली आहे. त्यांच्याकडून या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात लखनौ पोलिसांनी अटक केलेल्या इमरान शहजाद याचीही कस्टडी लवकरच घेण्यात येणार आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी पोलिस लखनौ येथे गेले आहेत. "लष्कर'चा कमांडर फहीम अन्सारीच्या चौकशीत इमरान शमशादचे नाव पुढे आले आहे. फहीम 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपींची चौकशी अंतिम टप्प्यात असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
(sakal ,6 jan)

No comments: