Friday, January 2, 2009

नोकर, सुरक्षा रक्षकही चोरट्यांचे खबरे?

मोठे जाळे उघडकीस ः पोलिसांकडून खबऱ्यांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः अनेक वर्षे तुमच्याकडे काम केले असल्याने तुमचा ज्यांच्यावर गाढ विश्‍वास आहे असा तुमच्या घरातील नोकर, मोलकरीण अथवा इमारतीचा सुरक्षारक्षक एखाद्या चोरट्यांच्या टोळीचा खबरी असण्याची दाट शक्‍यता आहे. दचकलात ना? तुमची ही शंका कदाचित खरीदेखील ठरू शकेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे, खार आणि सांताक्रू झ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक केली. या घरफोड्यांनी वर्षभराच्या काळात वीसहून अधिक घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुबाडल्याचे उघडकीस आले. चोरी करण्यासाठी श्रीमंतांची घरे शोधण्याकरिता त्यांनी खबरे ठेवल्याचे तपासात स्पष्ट झाले असून चोरीच्या ऐवजातील ठराविक रक्कम या खबऱ्यांना दिली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
वांद्य्राच्या बुलक रोड परिसरात सी ब्रीझ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या साहिदा मुश्‍ताक काथावाला (41) यांच्या घरात 2 नोव्हेंबरला पहाटे दोघा घरफोड्यांनी चोरी केली होती. घरात एकट्याच राहणाऱ्या साहिदा यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी घरातील सहा लाख रुपयांचा ऐवज चोरी केला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट- 10 च्या पोलिसांनी 25 डिसेंबरला तेजबहाद्दूर छेडीलाल मौर्या ऊर्फ विजय (23, रा. जुहू गल्ली) व शरीफ रमझान शेख (22, रा. जुहू) यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांनी मे - 2007 पासून आतापर्यंत वीसहून अधिक घरफोड्या केल्याचे कबूल केले.

घरफोडीत निष्णात असलेल्या या दोघा चोरट्यांचे वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरात खबऱ्यांचे मोठे नेटवर्क असल्याचे उघडकीस आले आहे. एखाद्या घरातील जुना नोकर, इमारतीचा सुरक्षारक्षक, मोलकरीण या चोरट्यांना एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती तसेच त्याच्या घरातील सदस्यांची अचूक संख्या सांगत असत. त्यामुळे दोन्ही घरफोड्यांना एखाद्या घरात चोरी करायला सोपे जात होते. पोलिस या चोरट्यांच्या खबऱ्यांचा शोध घेत असून काहींची चौकशी सुरू असल्याचेही गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मारिया यांनी सांगितले. तेजबहाद्दूर मौर्या बहुमजली इमारतीत ड्रेनेजच्या पाईपवरून चढण्यात आणि क्षणात उतरण्यात निष्णात आहे. काथावाला यांच्या घरातून चोरलेल्या सहा लाखांच्या ऐवजापैकी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. रात्री घरफोड्या केल्यानंतर दिवसा हे दोघेही चोरटे मोटारसायकलवरून वाटसरूंच्या बॅगा चोरण्याचेही काम करीत. त्यांच्यावर बॅगचोरीचे सात गुन्हे दाखल असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

No comments: