राज्य पोलिस मुख्यालयाचा ऐतिहासिक असेंब्ली हॉल. पोलिस खात्यातील सेवाकाळात दाखविलेले अतुलनीय शौर्य, तसेच बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची दखल म्हणून दर वर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांच्या वितरण सोहळ्याला राज्यभरातून पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या या पदकांच्या नामावलीत असलेल्या "त्या' दोन नावांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा काही क्षण ओलावल्या. राष्ट्रपती पोलिस पदकांसाठी त्या दोन शूर वीरांची नावे जाहीर होताच ही पदके घेण्यासाठी जाणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून मानवंदना दिली. "ती' दोन नावे होती 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेले सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे व अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे. ही पदके घेण्यासाठी गेले होते करकरे यांचे चिरंजीव आकाश आणि कामटे यांचे वडील निवृत्त कर्नल मारुती कामटे. गेल्या वर्षी उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबाबत दिल्या जाणाऱ्या पोलिस पदकांसाठी या दोन्ही अधिकाऱ्यांची निवड झाली; मात्र यंदा ही पदके घेण्यासाठी त्यांची जाणवलेली अनुपस्थिती उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी होती.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यावर 26-11 च्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणींची छाया होती. अतिशय चोख सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 11 वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी पोलिस पदक मिळविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2007-08 या वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदा 111 पोलिसांना राष्ट्रपती पदके देऊन गौरविण्यात आले. यात राजेंद्र शंकर काळे या दहिसर येथील पोलिस शिपायाला जीवाची पर्वा न करता कुप्रसिद्ध गुन्हेगाराला पकडल्याचे धाडस दाखविल्याबद्दल; तर 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरात सामान्य नागरिकांना वाचवीत असताना प्राण गमवावा लागलेल्या पोलिस शिपाई प्रदीप निंबाळकर यांना देण्यात आलेल्या शौर्य पदकाचाही समावेश होता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी पदकांसाठी त्यांच्या नावाची घोषणा होताच संचलन करीत राज्यपालांसमोर येत होते. त्यांना सॅल्युट करून पदक लावण्याकरिता आपली छाती पुढे करीत होते. हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक धडपडत होते. हुतात्मा झालेल्या अथवा अकाली निधन झालेल्या पोलिस अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पदक स्वीकारण्यासाठी राज्यपालांपर्यंत नेताना पोलिस त्यांची सोबत करीत होते. कार्यक्रम संपल्यानंतर महासंचालक कार्यालयाबाहेर असलेल्या प्रशस्त लॉनमध्ये अधिकारी व कर्मचारी आपल्या वरिष्ठांसोबत मंत्री महोदयांसोबत छायाचित्र काढताना दिसत होते; मात्र या सोहळ्यात 26-11 च्या हुतात्म्यांच्याच आठवणी उपस्थितांच्या तोंडून सर्वाधिक निघताना दिसत होत्या.
(sakal, 25 jan)
No comments:
Post a Comment