Tuesday, January 13, 2009

मुंबई पोलिसांकडूनच एफबीआयला माहिती

दहशतवादी हल्ला ः तपासासाठी दिवसरात्र मेहनत


मुंबई हल्ल्याप्रकरणी एफबीआयने पाकिस्तानला पुरावे दिल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारेच एफबीआयला आवश्‍यक ती माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबई पोलिस दिवसरात्र मेहनत करून या हल्ल्याचा तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांनी मुंबई पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होऊ शकते, असे मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी पकडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत पाकिस्तानविरोधी महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. मुंबई हल्ल्यानंतर तब्बल एका महिन्यापेक्षा जास्त दिवस पोलिसांची बारा पथके या प्रकरणातील लहान-सहान पैलूंचा तपास करीत आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांसह विविध शाखांचे 25 अधिकारी तपासाचे काम करीत आहेत. मोहम्मद अजमलच्या चौकशीत पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाच्या विरोधात गुन्हे शाखेने ठोस पुरावे गोळा केले आहेत. हल्ल्यानंतर मुंबईत आलेल्या इतर देशांनादेखील मुंबई पोलिसांनीच हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे सांगितले आहे. अशातच एफबीआयने या हल्ल्यासंबंधीचे पुरावे पाकिस्तानला दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात हे सर्व पुरावे मुंबई पोलिसांच्या माहितीच्याच आधारावर आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असताना मुंबई पोलिसांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेच येताना दिसत नाही. अशा प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे मनोबल खचू शकते. मुळातच एफबीआयच्या पथकाला मुंबई पोलिसांनी फक्त नऊ तासच चौकशीची परवानगी दिली होती, असेही हा अधिकारी म्हणाला. या प्रकरणी लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

( sakal,5 jan )

No comments: