Tuesday, January 13, 2009

गावदेवीत बिल्डरची गोळी झाडून हत्या

कारण अज्ञात : पूर्ववैमनस्य अथवा खंडणीचा वाद?

गावदेवी येथील बिल्डरची तो राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टबाहेर अनोळखी मारेकऱ्याने रिव्हॉल्व्हरने डोक्‍यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना रात्री उशिरा घडली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडिता रमाबाई मार्ग येथे असलेल्या कस्तुरबा भवन इमारतीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगम छबीनाथ मिश्रा (45) असे या हत्या झालेल्या बिल्डरचे नाव आहे. अष्टभुजा कन्स्ट्रक्‍शन या आपल्या कंपनीमार्फत मिश्रा सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे घेत असत. रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात छोटे बंधारे बांधण्याचे काम त्यांनी घेतले होते. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते स्वतःच्या कार्यालयातून पाचव्या मजल्यावरील आपल्या घरी निघाले होते. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या मारेकऱ्याने इमारतीच्या लिफ्टबाहेरच त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडून पलायन केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मिश्रा तेथेच मरण पावले. त्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेली दोन लाख रुपयांची रोख त्यांच्या मृतदेहाशेजारी पडलेली होती; तर उजव्या हातात असलेला मोबाईल फोन मृत्यूनंतरही त्यांच्या हातात तसाच होता. या इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे जेवणासाठी आलेल्या उमेल शहा नावाच्या व्यक्तीने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लिफ्टजवळ मिश्रा यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने गावदेवी पोलिसांना कळविण्यात आले.

कस्तुरबा भवन इमारतीत सुरक्षारक्षक; तसेच लिफ्टमन नसल्याने हा प्रकार समजण्यास बराच उशीर लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मिश्रा यांच्या हत्येबाबत त्यांची मुलगी व भागीदार यांची विचारपूस केली. मात्र अद्याप कोणताच धागादोरा हाती आला नसल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली.
अधिक तपासासाठी पोलिसांचे एक पथक रायगड जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. ही हत्या पूर्ववैमनस्य, व्यवसायातील शत्रुत्व अथवा खंडणीच्या वादातून झाली असावी का, याची चाचपणी करण्यात येत असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.

( sakal,4 jan )

No comments: