Friday, January 30, 2009

बॅंकेतून पळणाऱ्या दोघा परदेशी नागरिकांना अटक

गिरगावची घटना ः संमोहन शास्त्राद्वारे पैसे लुटण्याचा प्रयत्न

पन्नास रुपये सुट्टे करून घेण्याच्या बहाण्याने बॅंकेच्या कॅशियरच्या काऊंटरजवळ जाऊन त्याच्यावर संमोहन शास्त्राने मोहिनी घालून दहा हजार रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पळणाऱ्या दोघा परदेशी नागरिकांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. या चोरट्यांना मलबार हिल परिसरात एका वाहतूक पोलिसाने अडविण्याचा प्रयत्न करताच त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही या दोघांनी केला. या घटनेत हा पोलिस जखमी झाला आहे.
गिरगाव चौपाटीजवळ श्रीपत भवन येथे असलेल्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंकेत गुरुवारी दुपारी सव्वाच्या सुमारास हा प्रकार घडला. कुरम महमद खूर लालखान (38) आणि पालेरखान वली अब्बास वली (21) हे दोघे परदेशी नागरिक दुपारी बॅंकेत शिरले. पन्नास रुपयाचे सुट्टे घेण्याच्या बहाण्याने कॅनेडाचा रहिवासी असलेल्या पालेरखान बॅंकेच्या कॅशियरकडे गेला. या वेळी त्याने हातचलाखीने कॅशियरकडील दहा हजार रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बॅंकेतील इतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच पालेर खान आणि कुरम खान यांनी तेथून पळ काढला. बाहेर उभ्या असलेल्या मारुती गाडीतून दोघेही पळून जाऊ लागले. या घटनेची माहिती बॅंक व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. डी. बी. मार्ग पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस नियंत्रण कक्षातून जवळील पोलिस ठाण्यांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानुसार मलबार हिल पोलिसही या दोघा चोरट्यांच्या मागावर निघाले. ताडदेव येथे असलेला वाहतूक पोलिस शिपाई राजेश सावंत याने ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांनी सावंत यांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला, त्यात ते जखमी झाले. पोलिस शिपाई सावंत यांच्या हातून निसटलेल्या चोरट्यांना मलबार हिल पोलिस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. आर. माळी यांनी दिली. या चोरट्यांनी बॅंकेच्या कॅशियरवर संमोहन शास्त्राने मोहिनी घालून त्याच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही माळी यांनी या वेळी सांगितले.

(sakal,23 jan)

No comments: