Tuesday, January 13, 2009

मुलगा होत नसल्याने तीन महिन्यांचे बाळ पळविले.

महिलेला अटक : समाजसेविकेची भामटेगिरी उघडकीस

सहा मुलींना जन्म दिल्यानंतरही घराचा कुलदीपक समजला जाणारा मुलगा होत नसल्याने समाजसेविका म्हणून रुग्णालयात मिरविणाऱ्या महिलेने बोरिवली रेल्वेस्थानकातून एका महिलेचे तीन महिन्यांचे आजारी बाळ पळविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या या महिलेला रात्री उशिरा अटक केली. यानंतर पोलिसांनी बाळाला त्याच्या मातेच्या ताब्यात दिले असून, त्याच्यावर परळच्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहिसर येथे राहणाऱ्या निर्मला खरे (25) हिने तीन महिन्यांपूर्वी शताब्दी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव प्रेम ठेवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून प्रेमची प्रकृती ठीक नसल्याने 8 जानेवारीला सासू कमळाबाई (65) सोबत ती शताब्दी रुग्णालयात त्याच्या उपचारासाठी आली. रुग्णालयात बाळाच्या उपचाराकरिता आवश्‍यक उपकरणे उपलब्ध नसल्याने डॉक्‍टरांनी त्याला बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. भगवती रुग्णालयात प्रेमवर उपचार सुरू असताना रेशम जाना (27) नावाच्या कथित समाजसेविकेने चांगल्या उपचारासाठी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या वेळी निर्मलासोबत जाण्याची तयारीही तिने दर्शविली. स्वतःला समाजसेविका म्हणून मिरविणाऱ्या रेशमसोबत निर्मला व तिची सासू कमळाबाई बाळाला विरारच्या संजीवनी रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्‍टरांनी 9 जानेवारीला बाळाला पुन्हा घेऊन येण्यास सांगितले. या वेळी रेशमने निर्मलाला तिचा मोबाईल क्रमांक दिला.
दुसऱ्या दिवशी बोरिवली रेल्वेस्थानकात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 वर रेशम उभी राहिली. निर्मला तिचे आजारी बाळ प्रेम, तीन वर्षांची मुलगी पूजा आणि सासू कमळाबाई यांच्यासोबत रेल्वेस्थानकात आली. लहान मुलीला तहान लागल्याने निर्मलाने प्रेमला सासूकडे सोपविले. यानंतर मुलीला घेऊन ती पाणी पिण्यासाठी गेली. थोड्याच वेळात विरारला जाणारी लोकल आल्याचे सांगून रेशमने कमळाबाईंच्या हातातील बाळ स्वतःकडे घेत त्यांना निर्मलाला शोधायला पाठविले. कमळाबाईदेखील सुनेला शोधायला रेल्वेस्थानकात फिरू लागल्या. याचा गैरफायदा घेत रेशमने निर्मलाच्या तीन महिन्यांच्या आजारी प्रेमला घेऊन पोबारा केला. पूजाला पाणी पाजल्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आधी उभ्या असलेल्या ठिकाणी निर्मला आणि सासू आल्या, तेव्हा रेशम तेथून निघून गेल्याचे आढळले. यानंतर त्यांनी बोरिवली रेल्वेस्थानकात रेशमविरुद्ध तक्रार दाखल केली. स्थानकावर असलेल्या क्‍लोजसर्किट कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रेशमचे छायाचित्र मिळविले. बाळ आजारी असल्याने रेशम त्याला एखाद्या रुग्णालयात दाखल करेल याची शक्‍यता असल्याने पोलिस तिचा व प्रेमचा शोध रुग्णालयांत घेत होते. काल सायंकाळी परळच्या वाडिया बाल रुग्णालयात प्रेमला उपचारासाठी दाखल केलेल्या रेशमला निर्मलाने ओळखले. पोलिसांनी तेथेच तिला अटक केली. पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले बाळ ताब्यात घेऊन ते निर्मलाकडे सुखरूप पोहोचविले. सध्या प्रेमवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा मुलींनंतरही मुलगा होत नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली रेशमने पोलिसांना दिली. तिला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. गायकवाड यांनी दिली.

No comments: