राज्याचे अतिरिक्त पोलिस संचालक अहमद जावेद यांच्या ताफ्यातील चोरट्यांनी चोरलेली बोलेरो गाडी आज सकाळी मरोळ परिसरात बेवारस अवस्थेत सापडली. एमआयडीसी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.
चर्चगेट येथील दिनशॉ वाच्छा मार्गावर असलेल्या यशोधन इमारतीसमोरून ही गाडी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली होती. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधन इमारतीखालून पोलिसांचीच गाडी चोरीला गेल्याच्या घटनेने पोलिसांना चांगलाच धक्का बसला होता. या प्रकरणी वाहनचालक सचिन आडकेने मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून या गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. वायरलेसवरून सर्व पोलिस ठाण्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना अंधेरी एमआयडीसी येथील मरोळ पूर्वेला असलेल्या सातबाग परिसरात ही गाडी बेवारस अवस्थेत सापडली. पोलिसांनी तातडीने ही गाडी ताब्यात घेतली. पोलिस कारचोरांचा शोध घेत आहेत.
(sakal,15 jan)
No comments:
Post a Comment