Thursday, January 15, 2009

रागाच्या भरात चढविली पोलिसासह नागरिकांवर गाडी

एक पोलिस ठार ः कारचालकास अटक


दीड वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर आलेल्या विम्याच्या रकमेची देवघेव करण्यावरून उद्‌भवलेल्या वादातून एका कारचालकाने रागाच्या भरात दोन पोलिस आणि चार नागरिकांच्या अंगावर गाडी चढविल्याचा प्रकार गोरेगाव येथे काल मध्यरात्री घडला. या घटनेत जितेंद्र पवार हा पोलिस शिपाई ठार झाला, तर पोलिसासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आज कारचालकाला अटक केली.
गोरेगाव पश्‍चिमेला असलेल्या उन्नतनगर रोड येथे काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी राहणारा कमलेश मौर्या (वय 23) याचा दीड वर्षापूर्वी सांताक्रूझ येथे अपघात झाला होता. खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करणाऱ्या कमलेशच्या उपचाराचा खर्च त्याच्या मालकाने केला होता. काही दिवसांपूर्वी या अपघाताच्या विम्याचे एक लाख 20 हजार रुपये कमलेशकडे आले होते. या वेळी गाडीमालकाने त्याच्याकडून उपचारासाठी खर्च झालेल्या पैशांची मागणी केली. मात्र कमलेश ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. गाडीमालकाच्या वतीने कमलेशचा ओळखीचाच असलेला लालजी यादव (वय 32) त्याच्याकडून पैसे मागत होता. काल रात्री कमलेश दारू पिऊन आल्यानंतर जवळच वेणाताई सोसायटीत राहणाऱ्या लालजीच्या घरी गेला. या वेळी त्याने लालजीच्या घरावर लाथा मारून अंगावर गाडी चढविण्याची धमकी दिली. या वेळी घाबरलेल्या यादव याने गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देताच जितेंद्र पवार (28) आणि संजय सोनवणे (29) हे दोघे घटनास्थळी निघाले. मध्यरात्री झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील रहिवासी तेथे गोळा झाले. हे पाहून कमलेश तवेरा गाडी घेऊन तेथून निघून गेला. मात्र जितेंद्र पवार व संजय सोनवणे काही नागरिकांसह जवळच असलेल्या ओम्‌शांती सुपर मार्केटजवळ उभे राहिले. काही क्षणातच कमलेशने भरधाव तवेरा गाडी पवार यांच्यासह तेथे उभ्या असलेल्यांच्या अंगावर चढविली. या अपघातात दोघे पोलिस शिपाई; तसेच रणजित यादव, बिरबल यादव, संतोष यादव आणि सिकंदर यादव जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच असलेल्या ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र जितेंद्र पवार यांचा गाडीची जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांना अधिक उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आल
े.
पोलिसांनी कमलेश मौर्या याला आज सकाळी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा; तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एल. पी. गोरे यांनी दिली.
-----------------

(sakal,14 jan)

No comments: