Friday, January 16, 2009

पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

अतिरेकी हल्ला ः चौकशीसाठी न्यायालयात अर्ज करणार


मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना कुलाब्याच्या बधवार पार्क येथे उतरताना पाहणारी महिला अनिता उद्दैया हिच्याविरुद्ध पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली कफ परेड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अधिक चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्याकरिता न्यायालयात लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
26 नोव्हेंबरला सागरी मार्गाने मुंबईत आलेल्या दहापैकी सहा अतिरेक्‍यांना पाहिल्याचा दावा करणारी अनिता उद्दैया (49) रविवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली. अतिरेकी हल्ल्यातील महत्त्वाची साक्षीदार असे तिचे चित्र प्रसिद्धिमाध्यमांत रंगविण्यात आले. 14 जानेवारीला पुन्हा घरी परतलेल्या अनिताने नंतर पोलिसांना ती सातारा येथे गेल्याचे सांगितले होते; मात्र यानंतर तिने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आपल्याला काही तपासयंत्रणांच्या प्रतिनिधींनी अमेरिकेला नेल्याचा दावा केला. या संपूर्ण घटनाक्रमात अनिताने पोलिसांना खोटी माहिती दिल्याने पोलिसांत संभ्रम निर्माण झाला. ती आपल्या गुन्ह्यात साक्षीदारच नसल्याचा दावा मारिया यांनी केला. बधवार पार्क येथे राहणाऱ्या कित्येक नागरिकांनी अतिरेक्‍यांना उतरताना पाहिले आहे. अनिता उद्दैयाला आपण ओळख परेडलादेखील बोलावले नाही. अनिताच्या अमेरिकावारीचा दावा खोटा ठरवत तिच्याकडे पासपोर्ट नाही. खासगी विमानाने गेल्याचे ती सांगत असली, तरी विमानतळावर इमिग्रेशन विभागाचे अधिकारी तिला पासपोर्ट व व्हिसाशिवाय कसे काय पाठवू शकतील, असेही ते या वेळी म्हणाले. या सगळ्या प्रकरणात तिची चौकशी करण्यासाठी कलम 182 नुसार तिच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालयाच्या परवानगीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
मुंबई हल्ल्याचे आरोपपत्र या महिन्याच्या अखेरपर्यंत दाखल करण्यात येणार असून त्यासाठी विधीतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावरील खटला ऑर्थर रोड येथे विशेष न्यायालय स्थापन करून चालवावा, अशी विनंती करणारे पत्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांविरुद्धही लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

(sakal,16jan)

No comments: